(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’

शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे खासदार सिमरनजीत सिंंह मान यांचे विधान

खलिस्तानविषयी बोलायला अडचण नसल्याचाही दावा !

डावीकडे खासदार सिमरनजीत सिंंह मान

चंडीगड – ‘भगतसिंह याने एका तरुण ब्रिटिश अधिकार्‍याची, अमृतधारी शीख हवालदार चन्नन सिंह याची हत्या केली होती. ‘नॅशनल असेंब्ली’त बाँबही फेकला होता. आता तुम्ही मला सांगा की, भगतसिंह आतंकवादी होते कि भगत होते ? लोकांची हत्या करून संसदेत बाँब फेकणे, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ?’, असे विधान पंजाबमधील संगरुर येथील नवनिर्वाचित खासदार आणि शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे नेते सिमरनजीत सिंंह मान यांनी केले. या वेळी पत्रकारांनी त्यांना ‘भगतसिंह  इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढले’, असे सांगितले असता ते म्हणाले, ‘‘ही तुमची विचारसरणी आहे; पण काहीही असले, तरी भगतसिंह आतंकवादी आहे.’’

१. सिमरनजीत सिंह मान पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही खलिस्तानवर बोलू शकता, तसेच सभा घेऊ शकता. खलिस्तानविषयी बोलायला अडचण नाही.

२. मान यांच्या विधानावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे विधान अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचे पक्षाने म्हटले आहे, तसेच कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंह यांनी ‘मान यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्‍या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !
  • कुणी राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलले, तर लगेचच संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद होऊन प्रसंगी त्यांना अटक होते, याउलट उठसूठ कुणीही क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ संबोधूनही संबंधितांवर काहीही कारवाई होत नाही ! हे आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! क्रांतीकारकांचा असा अवमान करणारे लोकप्रतिनिधी आणि तो खपवून घेणारे सरकार कृतघ्नच होत ! जनतेने अशांना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !