‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, याची साधकाला आलेली प्रचीती !

१. प्रसंग क्र. १

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१ अ. महर्षींच्या आज्ञेनुसार तिरुपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरणे आणि त्या कालावधीत पुष्कळ थकवा असूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘शारदादेवी’ यांच्या चरित्राचे वाचन करत असणे

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि आम्ही ४ साधक (श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), श्री. विनीत देसाई अन् मी (वाल्मीक भुकन)) यांनी या वर्षीच्या (वर्ष २०२२) अक्षय्य तृतीयेला तिरुपतीच्या दर्शनाला जायचे आहे’, असे महर्षींनी नाडीवाचनामध्ये सांगितले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना या कालावधीमध्ये पुष्कळ थकवा असूनही त्या ‘शारदादेवी’ (स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी) यांच्या चरित्राचे वाचन करत होत्या.

श्री. वाल्मिक भुकन

१ आ. ‘प्रवासात शारदादेवींचे पुस्तक घ्यायला नको’, असे सांगितल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ते घेण्यास सांगणे आणि आज्ञापालन म्हणून पुस्तक समवेत घेणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि मी आमच्या ‘बॅगा’ भरत होतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांची ‘बॅग’ भरतांना मी म्हटले, ‘‘शारदादेवींचे पुस्तक आपण इथेच ठेवूया का ? तुम्हाला पुष्कळ प्रवास करायचा आहे. त्यामुळे वाचन करायला वेळ मिळणे कठीण आहे. आपण २ दिवसांनी परत येणार असल्याने हे घ्यायला नको.’’ त्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘आपण पुस्तक घेऊन जाऊया.’’ आज्ञापालन म्हणून मी ते पुस्तक समवेत घेतले.

१ इ. नाडीवाचनात ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ शारदादेवींच्या चरित्राचे वाचन करत आहेत’, असा उल्लेख येणे

तिरुपति बालाजीचे दर्शन झाल्यानंतर नाडीवाचन चालू झाले. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू शारदादेवींच्या चरित्राचे वाचन करत आहेत. त्यांचे जीवन शारदादेवींप्रमाणे आहे. शारदादेवींचे अपूर्ण राहिलेले कार्य श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.’

१ ई. ‘मी त्या वेळी बोलून जाते आणि त्याचा कार्यकारणभाव पुढे काही काळाने कळतो’, असे  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे

मी हे सर्व ऐकत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्याप्रती माझा कृतज्ञताभाव दाटून आला. ‘त्यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, हे मला शिकायला मिळाले. त्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मला म्हणाल्या, ‘‘मी त्या वेळी बोलून जाते आणि त्याचा कार्यकारणभाव पुढे काही काळाने कळतो की, देवाने त्या वेळी माझ्याकडून असे का बोलून घेतले ?’’

२. प्रसंग क्र. २

२ अ. प्रवासाच्या नियोजनाच्या आदल्या दिवशीच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी समवेतच्या साधकांना निघण्यास सांगणे आणि सर्वांनी तशी सिद्धता दाखवणे

वर्ष २०२१ मध्ये आम्ही उत्तर भारतात दौर्‍यावर गेलो होतो. दौरा संपल्यानंतर आम्ही देहलीहून चेन्नईला निघण्याचा विचार करून साहित्याची बांधणी (पॅकिंग) करत होतो. नियोजनानुसार आम्ही सर्व बांधणी करून दुसर्‍या दिवशी पहाटे निघणार होतो. आमची सिद्धता आदल्या दिवशी दुपारी ४ वाजता झाली होती. त्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुम्ही आता निघू शकता का ? तुम्हाला सर्वांना जमेल ना ?’’ स्नेहलदादा, विनीतदादा आणि मी, असे आम्ही तिघे जण प्रवास करणार होतो. आम्ही तिघे जण ‘हो’ म्हणालो; कारण त्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी आम्हाला स्वतःहून जाण्याच्या संदर्भात विचारले होते. यापूर्वी त्यांनी असे विचारले नव्हते.

२ आ. मुंबईजवळील पालघरला पोचताच वैतरणा नदीला पूर आल्याचे लक्षात येणे

आम्ही त्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता देहलीहून निघून रात्री १० वाजता जयपूरला पोचलो आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ३ वाजता जयपूरहून निघालो. ज्या दिवशी आम्ही निघालो, त्या दिवशी सकाळपासून पुष्कळ पाऊस पडत होता. आम्ही मुंबईजवळील पालघरमधील वैतरणा नदीवळ पोचलो. पावसामुळे त्या नदीचे पाणी पुष्कळ वाढले होते. नदीचे पाणी पुलाला खालून लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. पाणी संपूर्ण परिसरात पसरले होते. जिकडे दृष्टी जाईल, तिकडे पाणीच होते.

२ इ. पुलावरून पुढे गेल्यावर वाहतुकीसाठी पूल बंद करणार असल्याचे कळणे आणि पुलावरून वेळेत पुढे गेल्याने पूल बंद झाल्यावर उद्भवणार्‍या अडचणींपासून वाचणे

आम्ही त्या नदीच्या पुलावरून पुढे गेलो आणि एका ठिकाणी थांबलो. त्या वेळी पुलाच्या दिशेने पोलीस जात होते. आम्ही चौकशी केल्यानंतर कळले, ‘आम्ही ज्या पुलावरून पुढे आलो होतो, तिथे पाण्याची पातळी वाढल्यामुळे पोलीस तो पूल बंद करणार होते.’ पाऊस अजूनही जोरात चालूच होता. पोलिसांनी पूल बंद केल्यास ‘ते परत पुलावरून कधी जाऊ देणार ?’, याची निश्चिती नव्हती. आणखी १० – १५ मिनिटे उशीर झाला असता, तर आम्हाला इकडे येता आले नसते. आम्ही पुलाच्या अलीकडेच अडकून पडलो असतो.

२ ई. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘देवाने कालची वेळ सुचवल्यामुळे मोठे संकट टळले’, असे सांगणे

आम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘देवाने कालची वेळ का सुचवली ?’, हे आता कळले. देवामुळे मोठे संकट टळले. देव ते बोलून घेतो आणि त्याचा कार्यकारणभाव नंतर कळतो; कारण बोलले तसे घडलेले असते.’’

२ उ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेला सर्वसाधारण साधक आणि संत यांच्यातील भेद !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणतात, ‘‘सर्वसाधारण साधकांनी त्यांच्या भावानुसार प्रार्थना केल्यावर देव त्यांना विचार देतो; पण बुद्धीने विचार केल्याने ते तो विचार ग्रहण करत नाहीत आणि प्रसंग घडल्यानंतर त्यांना कळते, ‘असे केले असते, तर बरे झाले असते.’ संतांना देव विचार देतो आणि त्यानुसार ते लगेच कृती करतात. सद्गुरु जो संकल्प करतात, त्याप्रमाणे सर्व घडते आणि परात्पर गुरूंच्या अस्तित्वानेच सर्व कार्य होत असते.’’

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू, तुम्ही मला तुमच्या देवत्वाची साक्षात् अनुभूती दिली. स्वतःकडे कर्तेपणा न घेता ‘ईश्वर कसे करवून घेतो’, हे सांगून या प्रसंगात आपण मला मोठी शिकवण दिली.

मी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या तीन गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. वाल्मीक भुकन, चेन्नई, तमिळनाडू. (७.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक