गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना!
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी मुलुंड (पश्चिम), अशोकनगर येथील श्री जीवराज भाणजी शाह स्मारक ट्रस्ट सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तेथील प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर मोठे झाड कोसळले. यामध्ये रिक्शाचा बहुतांश भाग मोडला; परंतु रिक्शात असलेले साधक आणि रिक्शाचालक यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. स्थानिक नागरिक आणि सनातनचे अन्य साधक यांनी रिक्शात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. या वेळी रिक्शात बसलेल्या सनातनच्या साधिका सौ. ज्योती घाटकर (वय ४९ वर्षे), श्रीमती वनिता सावंत (वय ७२ वर्षे) आणि साधक श्री. दीपक घाटकर (वय ५२ वर्षे) या सर्वांनी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सकाळी ८ वाजता ही घटना घडली. या वेळी पुष्कळ पाऊस पडत होता. सभागृहाचे कर्मचारी श्री. दीपक सिंह आणि श्री. शंकर यांनी साधकांना रिक्शातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी कोसळलेले झाड हटवले.
भगवंताने मोठ्या संकटातून लीलया बाहेर काढले ! – पू. (सौ.) संगीता जाधव
या घटनेविषयी पू. (सौ.) संगीता जाधव म्हणाल्या, ‘‘आपल्या वेदना, भावना नष्ट करण्याची प्रक्रिया भगवंताच्या हाती असते. भगवंतानेच या प्रसंगात सर्वांना वाचवण्याचे नियोजन केले होते; परंतु थोडे जरी काही झाले, तरी आपण घाबरतो. या घटनेतील साधकांनी इतकी शांतता आणि स्थिरता अनुभवण्याचे कारण म्हणजे भगवंत त्या वेळी साधकांच्या समवेत होता. हा त्यांचा पुनर्जन्म आहे. मोठ्या संकटातून भगवंताने फुलाप्रमाणे अलगद सर्वांना बाहेर काढले. भाव दिसत नसतो. भगवंत कसा कार्य करतो ?, याची प्रचीती अनुभवण्यास मिळाली. गुरुकृपा संपादन करण्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करत राहूया.’’
मुंबई आणि उपनगर येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी घडलेले अन्य दुर्घटनासदृश्य प्रसंग !
१. जोगेश्वरी (मुंबई) आणि सानपाडा (नवी मुंबई) येथे गुरुपूजन चालू असतांना पूजेच्या चौरंगाजवळील समयांतील सर्व वातींनी एकदम पेट घेतला. त्यामुळे आगीची ज्वाळा निर्माण झाली. यामध्ये सानपाडा येथे ज्वाला विझवण्यासाठी गेलेल्या २ साधकांच्या हातावर गरम तेल उडून त्यांचे हात भाजले.
२. सनातनच्या साधिका सौ. कमल देशमुख दादर येथील गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी चालत येत होत्या. सभागृहाच्या जवळ आल्यावर त्यांच्या अगदी जवळ झाडाची फांदी तुटून पडली. यामध्ये त्या थोडक्यात वाचल्या. या वेळी मुसळधार पावसामुळे त्यांच्या हातातील छत्रीही उडून गेली.