देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

नवी देहली – सध्या देशभरातील २५ हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचा निर्माण झालेला पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. १२ जुलै या दिवशी संपूर्ण देशात २८९ मिलिमीटर पाऊस झाला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

पावसामुळे झालेल्या दुर्घटनांत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विविध ठिकाणी बचावकार्य केले जात आहे. सहस्रावधी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.