गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी आणि सनातनचे गुरु यांचे संदेश

ईश्वरप्राप्ती होण्यासाठी सनातनच्या साधकांनी भावभक्ती वाढवून गुरुसेवारूपी क्रियमाण वापरावे !

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

१. साधकांनी भावभक्ती वाढवून गुरुसेवारूपी क्रियमाण वापरल्यास गुरुदेव प्रसन्न होऊन साधकाला भवसागरातून पार करतील !

पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे. हात-पाय मारणार्‍या व्यक्तीकडे पाहून लोक तिला साहाय्य करायला येतील. साधकांची स्थितीही पोहायला येत नसलेल्या व्यक्तीसारखी आहे. या भवसागरात बुडालेल्या साधकांना पोहण्याची कला ठाऊक नाही. साधक म्हणतील, ‘मी सनातन संस्थेमध्ये आलो आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले मला ईश्वरप्राप्ती करवून देतील.’ सनातन संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येक साधकाने भावभक्ती वाढवायला हवी आणि गुरुसेवारूपी क्रियमाण वापरायला हवे. तेव्हाच गुरुदेव प्रसन्न होऊन साधकाला या भवसागरातून बाहेर काढतील.

२. साधकांनी ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, असा विचार करण्यापेक्षा हनुमंताप्रमाणे अखंड ‘गुरुस्मरण’ करावे !

काही साधक ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, असा विचार करतात. ‘कोणत्या साधकाची प्रगती कधी होणार ?’, हे गुरुदेवांना ज्ञात असते. साधकाची आध्यात्मिक प्रगती झाल्यावर ‘तो साधक कधी संत होणार ?’, हेही गुरुदेवांना ज्ञात असते. गुरुदेव योग्य वेळ येईपर्यंत वाट बघतात. ते घाई-घाईने एखाद्या साधकाला संत घोषित करत नाहीत. गुरुदेव योग्य वेळ आल्यावर त्या त्या साधकाला योग्य ते देतात; म्हणून साधकांनी ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, असा विचार करण्यापेक्षा ‘मी दिवसभरात किती वेळा गुरुदेवांचे स्मरण करतो ?’, याचे चिंतन करून गुरुस्मरण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. हनुमंताने त्याच्या हृदयात श्रीराम आणि सीता यांना स्थापित केले. त्याचप्रमाणे सनातनच्या प्रत्येक साधकाने त्याच्या हृदयात सनातनच्या तिन्ही गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति  (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) स्थापित करावे. हनुमंत अखंड श्रीरामाचे स्मरण करत असे. त्याप्रमाणे साधकांनीही अखंड ‘गुरुस्मरण’ करावे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडी वाचन क्र. २०४ (१४.६.२०२२))


गुरुपौर्णिमेनंतर येणार्‍या भीषण संकटकाळात सुरक्षित रहाण्यासाठी गुरुरूपी संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करा !

(परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

‘श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे भक्त, साधक, शिष्य आदींसाठी गुरुपौर्णिमा हा ‘कृतज्ञता उत्सव’ असतो. गुरूंमुळे आध्यात्मिक साधनेला आरंभ होऊन मनुष्यजन्माचे सार्थक होते. साधना न करणार्‍या व्यक्ती मात्र व्यावहारिक जीवन जगत असल्याने त्यांचा ‘अध्यात्म’, ‘साधना’, ‘गुरु’, ‘गुरुपौर्णिमा’ अशा शब्दांशी संबंधच येत नाही. या सर्वांना अध्यात्माचे महत्त्व थोडेफार तरी लक्षात यावे, यासाठी येणार्‍या भीषण संकटकाळाविषयी सांगणे आवश्यक आहे.

या गुरुपौर्णिमेनंतर काही मासांतच भारतालाच नव्हे, तर जगाला भीषण संकटकाळ अनुभवावा लागणार आहे. काही देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढून सर्वत्र महागाई प्रचंड वाढणार आहे. अन्नधान्य, औषधे, इंधन आदींचा प्रचंड तुटवडा भासणार आहे. अनेक देशांना भूकमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. युद्धजन्य स्थितीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीचा फटका बँकांनाही बसणार आहे. थोडक्यात, प्रत्येक कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल, अशी स्थिती येणार आहे. पुढे या युद्धाचे रूपांतर वैश्विक महायुद्धात होणार आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध आता फार दूर नाही.

भारतातही धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वत्र दंगली किंवा प्रचंड हिंसात्मक घटना घडणार आहेत. त्यामुळे सामाजिक असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या कुणीही सत्तेवर असले, तरी देशाची स्थिती अराजकसदृश्य होईल. हे अराजक कुठल्याही राजकीय पक्षाला रोखता येणार नाही. त्यामुळे या संकटकाळात कुठलाही राजकीय पक्ष तुमचे संरक्षण करील, या भ्रामक अपेक्षेत राहू नका !

येणार्‍या भीषण काळात आध्यात्मिक संरक्षककवच असल्याविना सुरक्षित जीवन जगता येणार नाही; म्हणूनच संकटकाळात केवळ भगवंताला शरण जातात. ईश्वराचे सगुण रूप असलेले संत सुदैवाने पृथ्वीवर आहेत. या गुरुरूपी संतांना शरण जा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करा. गुरुरूपी संतांच्या कृपेचे कवच किंवा साधनेचे आध्यात्मिक बळ हेच पुढील ४-५ वर्षांच्या पृथ्वीवरील सर्वांत वाईट काळात आपल्याला तारणार आहे, याविषयी श्रद्धा बाळगा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (३१.३.२०२२)


धर्मसंस्थापनेसाठी स्वक्षमतेनुसार योगदान द्या ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

शिष्याने श्रीगुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे. या काळात समाजाला हिंदु धर्माच्या संदर्भात जागृत करणे आणि धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील योगदान देणे, यांसाठी प्रत्येकाने स्वक्षमतेनुसार योगदान देणे, हेही एक प्रकारचे गुरुकार्य ठरते. अगदी कोणतेही कार्य करण्याची क्षमता नसलेली व्यक्तीही प्रतिदिन देवतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून या कार्यात योगदान देऊ शकते. या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वक्षमतेनुसार अधिकाधिक योगदान देण्याचा निश्चय करा !


देवाची कृपा संपादन करण्याचे प्रयत्न वाढवा ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सद्यःस्थितीत सामान्य व्यक्तीला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत आहे. जीवन आनंदी होण्यासाठी व्यक्तीने साधना (ईश्वरप्राप्तीसाठी दैनंदिन करायचे प्रयत्न) करणे आवश्यक असते. सध्या नित्यसाधना करणे अवघड वाटत असले, तरी तुम्ही जेथे असाल, तेथे देवाचा नामजप करणे, देवाशी सतत बोलणे, देवाला अधिकाधिक प्रार्थना करणे वा शरण जाणे, प्रत्येक कृतीचे कर्तेपण देवाला अर्पण करणे इत्यादी कृती करा ! त्यामुळे तुमच्यावर ईश्वराची कृपा लवकर होईल. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘माझी प्रत्येक कृती देवाची कृपा मिळण्यासाठी घडू दे’, अशी प्रार्थना करा !