पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त आयुर्वेदाची औषधे

१० जुलै २०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पावसाळ्यातील ताप, तसेच कोरोना महामारी यांमध्ये पाळायचे आहाराविषयीचे पथ्य’ या लेखात दिल्याप्रमाणे पथ्य पाळून पुढे दिलेले उपचार करावेत.

१. कारणांनुरूप उपचार

पावसाळ्यामध्ये सततच्या पावसाने वातावरणात पसरलेल्या थंडीपासून शक्य त्या परीने रक्षण केल्यास या दिवसांत होणारे सर्दी, खोकला आणि ताप लवकर बरे होण्यास साहाय्य होते.

अ. ताप असल्यास स्वेटरसारखे ऊबदार कपडे घालावेत. कानटोपी घालावी. यामुळे घाम येतो आणि ताप उतरतो.

आ. पिण्याचे पाणी उकळून कोमट करून प्यावे. या दिवसांत निरोगी व्यक्तीनेही गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास अन्नपचन चांगले होऊन आरोग्य चांगले रहाते.

वैद्य मेघराज पराडकर

इ. घसा तांबडा होणे, घसा खवखवणे किंवा दुखणे यांमध्ये कोमट पाण्यात थोडे त्रिफळा चूर्ण किंवा हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात.

ई. डोके जड होणे, सर्दीमुळे नाक चोंदणे, जबड्याच्या मुळाशी दाबल्यास दुखणे ही लक्षणे असतांना बाहेरून गरम कपड्याने शेक द्यावा. गरम पाणी प्यायल्यावर पेला गरम रहातो. त्याने शेकून घ्यावे. बाहेरून शेकणे हे वाफ घेण्यापेक्षा जास्त लाभदायक आहे. दिवसातून ४ – ५ वेळा शेक घ्यावा.

उ. रात्री पंखा लावून झोपल्याने थंड हवा नाकातोंडात जाते. घसा आतून कोरडा होतो आणि थंडीमुळे घशातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होऊ लागते. त्यामुळे घसा तांबडा होतो. हे टाळण्यासाठी फिरत्या टेबल फॅनचा (पंख्याचा) वापर करावा किंवा पंखा न लावता झोपावे. आजकाल ‘टायमर’चे पंखे आले आहेत. यामध्ये आपण झोपतांना ठराविक वेळाने पंखा बंद होण्याची सोय असते. त्याचा वापर करावा. झोपल्यावर थंड हवा नाकातोंडात जाऊ नये, यासाठी कानटोपी घालून नीट पांघरूण घेऊन झोपावे.

कोणत्याही उपचारपद्धतींनुसार औषधे घेतली, तरी वरील कारणांनुरूप उपचार केल्यास लवकर बरे होण्यास साहाय्य होते.

२. लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

२ अ. घसा खवखवणे किंवा घसा तांबडा होणे : ही लक्षणे दिसताच ‘चंद्रामृत रस’ १ – २ गोळ्या चघळाव्यात. लगेच बरे वाटू लागते. खोकला येत असल्यासही चंद्रामृत रसाचा उपयोग होतो. दिवसभरात ५ – ६ गोळ्या घेतल्या, तरी चालतात.

२ आ. सर्दी, खोकला आणि कफ होणे : १ चमचा ‘सितोपलादी चूर्ण’ आणि १ चमचा मध असे मिश्रण करून ठेवावे. दिवसातून मध्ये मध्ये हे मिश्रण वारंवार चाटावे. सितोपलादी चूर्ण दिवसभरात ३ चमच्यांपर्यंत वापरल्यास चालते. या चूर्णामुळे श्वसनमार्गातील विकृत कफ बाहेर पडण्यास साहाय्य होते, तसेच आवश्यक असा चांगला कफ बनू लागतो. यामुळे श्वसनमार्गाची शक्ती वाढते.

२ इ. ताप : ‘त्रिभुवनकीर्ती रस’ १ गोळी बारीक करून थोड्याशा मधात मिसळून चाटावी. ताप अधिक असल्यास प्रत्येक २ घंट्यांनी १ गोळी घ्यावी. दिवसाला ५ – ६ गोळ्या घेतल्या, तरी चालते. एका दिवसात तापाची तीव्रता न्यून न झाल्यास ताप अंगावर न काढता वैद्यांना भेटावे.

२ ई. बद्धकोष्ठता : ‘गंधर्व हरीतकी वटी’ २ गोळ्या कोमट पाण्यासह दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्याव्यात.

२ उ. कोरोना असल्याचे चाचणीत निष्पन्न होणे : ‘सुवर्णमालिनी वसंत’ किंवा ‘महालक्ष्मीविलास रस’ यांपैकी कोणतीही एक गोळी बारीक करून सकाळी रिकाम्या पोटी २ ते ४ थेंब मधात मिसळून चाटून खावी. साधारण ७ ते १५ दिवस हे औषध घेतल्यास रोग लवकर बरा होण्यास साहाय्य होते. ही दोन्ही औषधे सुवर्णयुक्त (सोन्याचे भस्म असलेली) आहेत. त्यामुळे यांचे मूल्य अधिक असते. आयुर्वेदानुसार सुवर्ण हे उत्तम विषहर औषध असून एक उत्कृष्ट रसायन आहे. विविध जीवाणू किंवा विषाणू यांचा संसर्ग झाल्याने त्यांचे विषार शरिरात पसरतात. सुवर्णयुक्त औषधांच्या सेवनाने या विषारांचा प्रतिकार करण्यास शक्ती येते. ‘रसायन’ म्हणजे उत्तम शरीरघटक निर्माण करण्यास साहाय्य करणारे औषध.

२ ऊ. आजारातून बरे झाल्यावर आलेला थकवा : ‘संशमनी वटी’, ‘प्रभाकर वटी’ किंवा ‘लक्ष्मीविलास रस’ यांपैकी कोणतेही एक औषध १ – १ गोळी बारीक करून दुपारी आणि रात्री जेवणानंतर २ ते ४ थेंब मधात मिसळून चाटून खावे. या औषधांमध्ये अभ्रक भस्म, लोहभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म यांसारखे रक्त सकस बनवणारे, तसेच शरिराला शक्ती देणारे घटक असतात. रुग्णाईत असतांना रोगाशी लढण्यात शरिराची जी शक्ती खर्च होते, ती या औषधांच्या योगाने भरून निघते.

(हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी आपण आपल्या वैद्यांशी वा आधुनिक वैद्यांशी (डॉक्टरांशी) बोलून घेऊन औषधोपचार घ्यावेत. – संकलक)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२२)