पावसाळ्याचा आरंभ झाल्यावर सर्वत्र सर्दी, खोकला आणि ताप या विकारांचे प्रमाण वाढते. या लेखात पावसाळ्यात होणाऱ्या या विकारांसंदर्भातील आयुर्वेदीय दृष्टीकोन समजून घेऊ. या लेखातील माहिती कोरोना महामारीसाठीही उपयुक्त आहे.
१. पावसाळ्यात निसर्गतः शरिरातील ‘अग्नी’ मंद होणे
पावसाळ्यात बहुतेक वेळा दिवसभर आकाश ढगाळ असते. सततच्या पावसामुळे वातावरण थंड असते. यांमुळे शरिरातील अग्नी, म्हणजेच पचनशक्ती मंद झालेली असते. त्यातही श्रमाची कामे न करणारे किंवा केवळ बैठी कामे करणारे यांचा अग्नी भरपूर व्यायाम किंवा श्रम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मंद असतो. अन्य प्रदेशांच्या तुलनेत कोकणात पावसाचे प्रमाण पुष्कळ अधिक असते. त्यामुळे या भागातील व्यक्तींचा अग्नी इतरत्रच्या व्यक्तींच्या अग्नीपेक्षा मंद असतो.
२. ताप येतांना शरिरात घडणाऱ्या घडामोडी
अग्नी मंद असतांना नेहमीप्रमाणे आहार घेतल्यास काही वेळा तो पचत नाही. त्यामुळे शरिरातील वात, पित्त आणि कफ दूषित होतात, म्हणजे त्यांचे संतुलन बिघडते. हे दूषित झालेले दोष (वात, पित्त आणि कफ यांना ‘दोष’ असे म्हणतात.) अग्नीवर आवरण घालतात आणि त्याला स्वतःच्या स्थानापासून बाजूला सारतात. यामुळे अग्नी स्वतःचे स्थान, म्हणजे अन्नाचा मार्ग (जठर, लहान आणि मोठे आतडे इत्यादी) सोडून रक्तामध्ये जातो आणि तेथे उष्णता निर्माण करतो. अन्नपचन नीट न झाल्याने शरिरातील घाम वाहून नेणाऱ्या वाहिन्या बंद होतात आणि घाम येत नाही. शरिराचे तापमान वाढते. यालाच आपण ‘ताप’ म्हणतो.
३. तापातून बरे होण्यासाठी करायचे ‘लंघन (उपवास)’
तापाचे मुख्य कारण ‘शरिरातील अग्नी मंद होणे’, हे असते. त्यामुळे तापातून बरे होण्यासाठी अग्नीवर अतिरिक्त भार न टाकता त्याला पुन्हा स्वतःच्या स्थानी आणावे लागते. काही न खाता उपवास केल्याने अग्नीवर अतिरिक्त भार पडत नाही. उपवासालाच आयुर्वेदात ‘लंघन’ असे म्हटलेले आहे. लंघन केल्याने शरिराला नेहमीच्या पचनव्यापारातून थोडी विश्रांती मिळून तापातून बरे होण्यासाठी वेळ मिळतो. आजकाल ताप आलेल्या व्यक्तीला प्रथिने अधिक असलेला आहार म्हणून दूध, दही, अंडी इत्यादी खाण्यास दिले जाते. या पदार्थांमध्ये प्रथिने जरी अधिक असली, तरी ती पचवण्याची क्षमता रुग्णाईत शरिरामध्ये नसते. त्यामुळे तापामध्ये दूध, दही यांसारखा पचण्यास जड असा आहार टाळावा.
३ अ. निराहार लंघन (काहीही न खाता उपवास करणे) : पावसाळ्याच्या दिवसांत ताप आल्यास त्या दिवसापुरते एक वेळचे जेवण न घेता कडक उपवास करावा. (मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर न्यून करणारी औषधे चालू असतील, तर उपवासाच्या दिवशी ती औषधे घेऊ नयेत किंवा यासंबंधी आधुनिक वैद्यांना विचारून घ्यावे.) तहान लागेल, तेव्हा उकळून कोमट झालेले पाणी प्यावे. पाणी उकळतांना त्यामध्ये एका लिटरला पाव चमचा याप्रमाणे सुंठीचे चूर्ण घातल्यास असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते. ज्यांना अंगावर पुरळ उठणे, तोंड येणे, लघवीच्या वेळेस जळजळ होणे असे उष्णतेचे त्रास होतात, त्यांनी सुंठीऐवजी नागरमोथ्याचे चूर्ण वापरावे.
३ आ. ‘लाजामंड (लाह्यांची औषधी पेज)’ : एक वेळ जेवण न घेतल्याने पोटाला विश्रांती मिळते आणि भूक लागते. अशा वेळी मूठभर लाह्या (कोणत्याही धान्याच्या) किंवा पोहे तांब्याभर पाण्यात उकळावेत. हे उकळत असतांना त्यामध्ये चवीनुसार सुंठ आणि धने घालावेत. पिंपळी चूर्ण असल्यास तेही चिमूटभर घालावे. लाह्या चांगल्या शिजल्यावर केवळ पाणी तेवढे गाळून गरम गरम थोडे थोडे प्यावे. आवश्यकतेनुसार यामध्ये साखर किंवा मीठ घालावे. साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरणे अधिक चांगले असते. लाह्यांच्या या पाण्याला संस्कृतमध्ये ‘लाजामंड’ असे नाव आहे. ‘मंड’ प्यायल्याने लगेच तरतरी येते, शक्ती मिळते, तसेच घाम येऊन ताप उतरण्यास साहाय्य होते. (सुंठ, नागरमोथा आणि पिंपळी ही चूर्णे आयुर्वेदीय औषधांच्या दुकानांत मिळतात. सनातनची ‘शुण्ठी (सुंठ) चूर्ण’, ‘मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ आणि ‘पिप्पली (पिंपळी) चूर्ण’ ही उत्पादनेही उपलब्ध आहेत.)
३ इ. क्रमाक्रमाने आहार वाढवणे : यानंतर जेव्हा पुन्हा भूक लागेल, तेव्हा भुकेच्या प्रमाणात मूग, तूर, मसूर किंवा कुळीथ यांपैकी कोणत्याही कडधान्याचे कढण किंवा वरण १ – २ चमचे तूप घालून प्यावे. असा पातळ आहार घेतल्यावर लगेच भूक शमते, असे काही वेळा होत नाही. त्यामुळे थोडा धीर धरावा. कोणत्याही स्थितीमध्ये अती खाणे होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. यानंतर जेव्हा भूक लागेल, त्या वेळी नेहमीचा आहार चालू न करता बरे वाटेपर्यंत वरीलप्रमाणे वरण किंवा कढण, गव्हाचा रवा भाजून त्याची दूध न घालता बनवलेली लापशी, शिरा किंवा उपमा, तांदुळाची उकड, मऊ भात, वरण भात, भाज्यांचे पातळ सूप यांसारखा हलका आहार थोडे तूप घालून गरम गरम घ्यावा. काही वेळा गरम खाण्याची इच्छा होत नाही. त्या वेळी कोमट किंवा सामान्य तापमानाला आहार घ्यावा. तोंडाला चव येण्यासाठी लोणचे किंवा खारात (मिठात) घातलेली कैरी थोड्या प्रमाणात घेतली, तरी चालते; परंतु पित्त वाढून त्रास होईल, एवढे लोणचे किंवा कैरी खाऊ नये. ज्यांना कफाचा त्रास आहे, त्यांनी तांदुळाचे पदार्थ टाळून त्याऐवजी कडधान्यावर जास्त भर द्यावा. रुग्णाईत असतांना प्रथिनेयुक्त आहार म्हणून दूध, दही किंवा अंडी यांसारखे पचण्यास जड पदार्थ खाण्यापेक्षा मूग, तूर यांसारख्या पचायला हलक्या डाळी खाणे हिताचे आहे. ताप पूर्णपणे गेला आणि सर्व नेहमीप्रमाणे चालू झाले की, मगच पोळी, भाजी, पोहे यांसारखे नेहमीचे पदार्थ पचनशक्तीचा अनुमान (अंदाज) घेऊन हळूहळू चालू करावेत. थोडेसे बरे वाटले की, लगेच नेहमीचा आहार चालू केल्यास ताप पुन्हा येण्याची शक्यता असते.
४. रुग्णाईत असतांना वर्ज्य करावयाचे पदार्थ
रुग्णाईत असतांना कोणत्याही परिस्थितीत पोहे, दूध, दही आणि दुधाचे अन्य पदार्थ, पोळी, बेकरी पदार्थ, मसालेदार, तसेच तळलेले पदार्थ आणि फळे खाऊ नयेत. शहाळ्याचे पाणीही शक्यतो टाळावे. रुग्णाईत असतांना हे पदार्थ पचवण्याची शरिराची क्षमता नसते. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. ‘अवलेह’ स्वरूपातील औषधे ताप असतांना घेऊ नयेत. (‘अवलेह’, म्हणजे ‘गुलकंद, च्यवनप्राश यांसारखी औषधे’.)
५. पथ्यपालनाचे महत्त्व
कोणत्याही उपचारपद्धतीनुसार औषधे घेतली, तरी वरील पथ्ये पाळणे हिताचे आहे. रुग्णाचे बल (रोगप्रतिकारक क्षमता) चांगले असेल, तर केवळ पथ्य पालन केल्यानेही त्याचा विकार बरा होतो. औषधांची आवश्यकताच रहात नाही. एवढे पथ्याचे महत्त्व आहे. वरील पथ्य केवळ तापातच नव्हे, तर विशेषतः पावसाळ्यात भूक न लागणे, शरीर किंवा पोट जड वाटणे, ‘आधीचे खाल्लेले पचलेले नाही’, असे वाटणे, खाल्लेले घशाकडे येणे यांपैकी कोणतेही लक्षणे निर्माण झाल्यावर चालू केल्यास या लक्षणांमध्ये तत्काळ लाभ दिसून येतो आणि पुढील तापासारख्या रोगाचे अरिष्ट टळते. ‘पथ्य पाळणे’, म्हणजे रोगाचे कारण थांबवणे. ‘कारण नसल्यास कार्य घडत नाही’, हा सर्वमान्य सिद्धांत आहे. त्यानुसार रोगाची कारणे थांबवल्यास रोग आपोआप बरा होतो. आयुर्वेदात याला ‘स्वभावोपरम (निसर्गतः (रोग) शांत होणे)’ असे म्हटले आहे.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी आपण आपल्या वैद्यांशी वा आधुनिक वैद्यांशी (डॉक्टरांशी) बोलून घेऊन औषधोपचार घ्यावेत. – संकलक
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२२)