अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या संकटातून आमदार टी. राजासिंह आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले !

भाग्यनगर – अमरनाथ गुफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळाजवळ ८ जुलैला झालेल्या ढगफुटीमध्ये तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह अन् त्यांचे कुटुंबीय अडकले होते. या संकटातून ते थोडक्यात बचावले. सिंह यांना विशेष संरक्षण व्यवस्था असल्याने भारतीय सैन्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून सुखरूप बाहेर काढून श्रीनगरला पोचवले.

टी. राजासिंह यांनी त्यांच्या या चमत्कारिक अनुभवाविषयी सांगितले की, अमरनाथाचे दर्शन घेऊन खाली येतांना आम्ही पाहिले की, हवामान खराब होत चालले होते. त्यामुळे ‘हेलिकॉप्टर’द्वारे उतरण्याऐवजी आम्ही घोड्यांचे साहाय्य घेतले. एक किलोमीटर अंतरावर ढगफुटी झाल्याचे मी डोळ्यांनी पाहिले. या वेळी त्यांनी सैन्याकडून चालू असलेल्या बचावकार्याचेही कौतुक केले.