हिंदूंच्या देवतेवर श्रद्धा असणार्‍या अहिंदूला मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू ) – जर अन्य धर्मातील व्यक्तीची हिंदु धर्मातील एखाद्या देवतेवर श्रद्धा असेल आणि ती तिचे दर्शन घेऊ इच्छित असेल, तर तिला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, तिच्यावर बंदी घालता येणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला. या याचिकेद्वारे अहिंदूंना तिरुवत्तर येथील अरुल्मिघू आदिकेसव पेरुमल तिरुकोविलच्या कुंबाबीशेगम् उत्सवामध्ये सहभागी होऊ नये, असा आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. सी. सोमन यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. या उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेवर एका ख्रिस्ती मंत्र्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

न्यायालयाने म्हटले की, जन्माने ख्रिस्ती असणारे गायक येशूदास यांची भक्तीगीते अनेक मंदिरांमध्ये वाजवली जातात. वेलंकनी चर्च आणि नागैर दर्गा येथे अनेक हिंदू मोठ्या संख्येने नियमित जातात. मोठ्या धार्मिक उत्सवाच्या वेळी कोणती व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, हे ओळखणे आणि तिला प्रवेश न देणे अशक्य आहे.