विविध कृती भगवंताशी कशा जोडाव्यात ?

‘आपली प्रत्येक हालचाल, एवढेच नव्हे, तर प्रत्येक श्वासही केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच चालू आहे’, ही जाणीव कृतज्ञतापूर्वक ठेवल्यास आपण अखंड भावावस्थेत राहू शकतो. यासाठी ‘आपली प्रत्येक कृती आपण भगवंताशी कशी जोडू शकतो ?’, या संदर्भात देवाने सुचवलेल्या भावपूर्ण प्रार्थना येथे देत आहे.

१. सकाळी उठल्यावर ठेवावयाचा भाव : सकाळी उठल्यावर, ‘हे भगवंता, आजचा दिवस केवळ तुमच्या कृपेनेच मी पाहू शकले’, असे म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच प्रार्थना करावी, ‘हे भगवंता, दिवसभरात प्रत्येक क्षणी मला तुमचे स्मरण होऊ दे. मला प्रत्येकामध्ये तुम्हाला पहाता येऊ दे. मला चराचरात तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे. ‘प्रत्येक प्रसंगाच्या माध्यमातून तुम्हीच भेटणार आहात’, असा भाव ठेवून मला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे. मला चुका मनापासून स्वीकारता येऊन त्याविषयीची माझी संवेदनशीलता वाढू दे’, अशी प्रार्थना करावी.

२. अंथरुणाची घडी घालतांना : ‘देवा, ही सेवा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे.’

३. दात घासतांना : ‘माझ्या मुखात चैतन्य येण्यासाठी आणि माझी वाणी शुद्ध होण्यासाठी तुम्हीच हे सारे उपलब्ध करून दिले आहे. गुरुदेवा, माझ्या मुखातून तुम्हाला अपेक्षित तेच बोलले जाऊ दे. माझी मुखशुद्धी होऊ दे.’

४. अंघोळ करतांना : ‘गुरुदेवा, हे पाणी म्हणजे तुमचे चरणतीर्थ आहे. त्यातील चैतन्याने माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी होऊ दे. माझी देहाविषयीची आसक्ती नष्ट होऊन देह पवित्र होऊन तुमच्या चरणसेवेसाठी समर्पित होऊ दे.’

५. वस्त्रे परिधान करतांना : ‘देवा, तुझ्या चैतन्याने भारित झालेली ही वस्त्रे तूच मला दिली आहेस. त्याविषयी माझ्या मनात तुझ्याप्रती अखंड कृतज्ञताभाव टिकून राहू दे.’

– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सनातन आश्रम, गोवा. (६.१.२०१६)