बालकभाव

बालकभाव असणाऱ्या साधकाच्या मनात एखाद्या बालकासारखी निरागसता, निर्मळता आणि ‘मी देवाचे लहान मूल आहे. देवच माझी माता, पिता, बंधू, सखा अन् सर्वस्व आहे, तोच माझे रक्षण करणारा आहे’, असा भाव निर्माण होतो. ‘करुणाकर, भक्तवत्सल श्रीकृष्ण सतत माझ्यासमवेत असून तोच माझी माता अन् पिता बनून अत्यंत प्रेमाने काळजी घेत आहे. मला जेव्हा तहान-भूक लागते, झोप येते किंवा दुखापत होते, तेव्हा मी त्याच्याकडे धावत जाते. मी सकाळी उठल्यावर तो माझे तोंड धुऊन स्वतःच्या पितांबराने ते पुसतो. तो मला अंघोळ घालतो आणि मला कपडे घालतो. श्रीकृष्ण माझे छोटे पाय त्याच्या मांडीवर घेऊन पैंजण घालतो. तो मला लोण्याप्रमाणे मऊ असा दही-भात भरवतो. श्रीकृष्ण माझ्यासमवेत खेळतो. मांडीवर घेऊन एका हाताने डोक्यावर थोपटतो आणि दुसऱ्या हाताने माझे पाय चेपून मला झोपवतो. एखादी मुलगी ज्याप्रमाणे आपल्या पित्यावर पूर्णपणे विसंबून असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णच माझी सर्वतोपरी काळजी घेणार असल्याने मी निर्धास्त आहे’, अशा प्रकारचा भाव म्हणजे बालकभाव !

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘बालकभावा’तील चित्रे (भाग १))