गोव्यात हिंदूंचे धर्मांतर १०० दिवसांत बंद केले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, ७ जुलै (वार्ता.) – गोव्यात हिंदूंचे होत असलेले धर्मांतर सरकार स्थापन झाल्यानंतरच्या १०० दिवसांत बंद केले. माझ्या सरकारने धर्मांतराच्या विरोधात कठोर पावले उचलली आणि यामुळे गोव्यात गेली कित्येक वर्षे होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराला आता आळा बसला आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गोव्यात भाजपप्रणीत सरकार स्थापन होऊन १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात गरीब, पीडित लोकांचे धर्मांतर केले जात असल्याचे आणि धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नसल्याचे विधान केले होते. शिवोली येथील बिलिव्हर्सचा पास्टर (पाद्री) डॉम्निक फर्नांडिस याच्या विरोधात धर्मांतराच्या २ तक्रारी म्हापसा पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर म्हापसा पोलिसांनी त्वरित पास्टर डॉम्निक फर्नांडिस याला कह्यात घेतले. पास्टर डॉम्निक फर्नांडिस याची दुसर्‍या दिवशी सशर्त जामिनावर सुटका झाली. यानंतर पोलिसांनी पास्टर डॉम्निक याच्या कारवायांचे अन्वेषण करत आहेत. गोवा सरकारच्या वाहतूक खात्याने पास्टर डॉम्निक फर्नांडिस याला त्याच्या महागड्या वाहनावर दिलेली ‘रस्ता करा’तील सूट मागे घेऊन त्याला दंड ठोठावला आहे.

गोव्यात गेल्या दशकभरात ‘बिलिव्हर्स’ने सुमारे १ लाख ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतराच्या कारवायांच्या विरोधात कठोरतेने पावले उचलल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सार्वजनिकरित्या आभार व्यक्त केले आहेत.