देशाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन राष्ट्र बलशाली करणे, ही काळाची आवश्यकता !

१० जुलै २०२२ या दिवशी देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) आहे. त्या निमित्ताने…

समर्थभक्त (कै.) सुनील चिंचोलकर

वारकरी संप्रदाय आणि  समर्थ संप्रदाय

१. संतांमध्ये भेद करू नये !

अ. समर्थ म्हणतात :

साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरुपि मिळाले ।
अवघे मिळोनि येकाचि जाले । देहातीत वस्मू ।।

आ. माऊली म्हणते : आत्मज्ञान चोखडी । संत ही माझी रुपडी ।

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘शनि कोणत्याही पोशाखात आला, तरी कुत्रे त्याला ओळखते. तद्वत संत कोणत्याही रूपात प्रकट झाले, तरी आपण त्यांना ओळखले पाहिजे.’

आपण संतांमध्ये भेद करू नये. दोन संतांमधील भेद हा देशकाल परत्वे असतो, तसेच साम्य असल्याची सूत्रे जशी महत्त्वाची असतात, तेवढी भेदाची सूत्रे महत्त्वपूर्ण नसतात. ‘दासबोध’ वाचतांना त्यात लपलेले संतश्रेष्ठ ज्ञानदेव दिसावेत आणि ‘ज्ञानेश्वरी’ वाचतांना त्यात दडलेले समर्थ रामदासस्वामी समजावेत. देहूच्या मंदिरात समर्थांचे दर्शन घडावे, तर सज्जनगडावरील समर्थ मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडावे.

२. साहित्यिकांच्या दृष्टीतून संत आणि त्यांच्याकडून केले जाणारे सदोष वर्गीकरण

महाराष्ट्रात साहित्यिक मंडळी संतांचे वर्गीकरण प्रवृत्तीवादी  आणि निवृत्तीवादी या दोन प्रकारांमध्ये करतात.

संतांच्या उपदेश कथनात भौतिक उपदेश आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांचा भाग किती ? यावरून हे वर्गीकरण केले जाते. ते फार वावगे आहे किंवा चूक आहे असे नाही; पण असे वर्गीकरण केल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदासस्वामी या प्रवृत्तीवादी संतांना श्रेष्ठ ठरवले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या निवृत्तीवादी संतांना न्यून लेखले जाते, हे संपूर्ण सदोष आहे. भगवान रामकृष्ण परमहंस गुरु होते, तर स्वामी विवेकानंद हे त्यांचे शिष्य होते. रामकृष्ण निवृत्तीवादी, तर स्वामीजी प्रवृत्तीवादी मानले जातात. मग आता स्वामीजींना रामकृष्णांपेक्षा श्रेष्ठ मानणार का ? संतांच्या चित्तात असा श्रेष्ठ कनिष्ठ भाव असतो का ? शंकराचार्यांना ‘जगद्गुरु’ म्हटले जाते; पण अन्य संतांना जगद्गुरु म्हटले जात नाही. याचा अर्थ अन्य संत जगद्गुरु नाहीत का ? रामदासस्वामींना ‘समर्थ’ ही उपाधी लागली. अन्य संतांच्या मागे ही उपाधी लावली जात नाही. याचा अर्थ अन्य संत समर्थ नाहीत का ? साहित्यिक वर्गीकरणापर्यंत थांबत नाहीत, तर ते त्याच्यापुढे जाऊन संतांच्या श्रेणी ठरवतात. तेव्हा सर्व गडबड चालू होते. यातून सारी कटुता, कलह आणि सांप्रदायिक कट्टरता जन्माला येते.

संत ज्ञानेश्वर यांना निवृत्तीवादी ठरवले, तरी ज्ञानेश्वरीमध्ये कर्माचे समर्थन करणाऱ्या कितीतरी ओव्या दाखवता येतील. समर्थ रामदासस्वामी यांना कितीही प्रवृत्तीवादी ठरवले, तरी त्यांच्या वाङ्मयात निवृत्तीचे किंवा मायावादाचे समर्थन करणाऱ्या ओव्या आढळतात. तेव्हा हे वर्गीकरणही अगदी सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल समजण्याचे कारण नाही.

३. दोन्ही संप्रदायांमध्ये आजपर्यंत असलेला जिव्हाळा

अ. समर्थांच्या काळात तरी या दोन संप्रदायात जिव्हाळा होता. समर्थ पंढरपूरला येत. त्यांना विठ्ठलाने रामरूपात दर्शन दिल्याची नोंद समर्थांच्या अभंगात आहे. समर्थांचे मेथवडे (सोलापूर) येथील शिष्य तेव्हापासून आजपर्यंत आषाढी एकादशीची पंढरपूर वारी करत आहेत. समर्थांनी विठ्ठलभक्तीची रचना केली आहे, तर तुकोबारायांचे रामभक्तीचे अभंग लोकप्रिय आहेत.

आ. अमरावतीजवळ रहाटगावला कै. गणेशदास महाराजांनी मंदिर बांधले आहे. त्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी या तिघांच्या मूर्ती आहेत.

इ. अकोल्यात डॉ. काकासाहेब चौधरी यांनी उभारलेल्या संत ज्ञानेश्वर मंदिरात समर्थांची मूर्ती बसवली आहे. वारकरी संप्रदायातील जंगले महाराजांनी आळंदीत चांगदेव वडाजवळ ज्ञानदेवांचे मंदिर बांधले असून त्यातही समर्थांची मूर्ती आहे.

ई. ह.भ.प. मारुति महाराज थोरात, ह.भ.प. हुंडे महाराज, ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प. किसन महाराज साखरे, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर ही वारकरी मंडळी आपल्या कीर्तनात समर्थांचे अभंग संदर्भाला घेत असतात. अनेक रामदासी कीर्तनकार ‘ज्ञानोबा तुकाराम’ यांची वचने नारदीय कीर्तनपरंपरेत निःसंकोचपणे वापरत असतात.

उ. अलीकडे होऊन गेलेले ब्रह्मलीन दासगणू महाराज, ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती, कै. स्वामी माधवनाथ, कै. चंद्रशेखर महाराज आठवले यांनी रामदासी आणि वारकरी संप्रदायांच्या समन्वयाचा जणू वसाच घेतला होता. कै. चंद्रशेखर महाराज समर्थांच्या अभंगांवर वारकरी कीर्तन करत. सध्या विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकरही प्रत्येक आषाढी एकादशीला समर्थांच्या अभंगांवर कीर्तन करतात.

४. बलशाली राष्ट्रासाठी भक्ती-शक्ती संगम अटळ !

दोन्ही संप्रदायांत उदारमतवादी भक्त आहेत आणि ते हा दुरावा नाहीसा करण्याचे काम मनापासून करत आहेत. आपल्या देशापुढील समस्या लक्षात घेता सर्व संप्रदायांची शक्ती एकत्र येऊन आपले राष्ट्र बलशाली करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती संगम अटळ आहे.

– समर्थभक्त (कै.) सुनील चिंचोलकर, पुणे

समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचा एकमेकांविषयीचा आदरभाव

समर्थ रामदासस्वामी
संत तुकाराम महाराज

समर्थ रामदासस्वामी प्रवृत्तीवादी म्हणून, तर संत तुकाराम महाराज हे निवृत्तीवादी म्हणून ओळखले जातात. हे दोघेजण समकालीन आहेत. त्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. त्यांनी एकमेकांचे वर्णन करणारे अभंग लिहिले आहेत. ते दोघेजण एकमेकांची स्तुती करतात, असेच दिसून येते. समर्थ तुकोबारायांची स्तुती करतात. दोघे एकमेकांचा मोठेपणा जाणतात. समर्थ आळंदीला गेले असतांना त्यांनी ज्ञानदेवांचीही आरती केली. त्यात ते ज्ञानदेवांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. आजही गोरटे संस्थानमध्ये प्रति गुरुवारी मंदिरात समर्थकृत ज्ञानदेवांची आरती म्हटली जाते.

संपादकीय भूमिका 

देश बलशाली करण्यासाठी संप्रदाय आणि जातीपात यांत विखुरलेल्या हिंदूंनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक !