विडंबन आणि विरोधाभास !

कॅनडास्थित तमिळ भाषिक चित्रपट निर्मात्या, कथित सामाजिक कार्यकर्त्या आणि समलैंगिकतेच्या पुरस्कर्त्या लीना मणीमेकलई यांनी ‘काली’ नावाच्या माहितीपटाचे भित्तीपत्रक ‘राइम्स ऑफ कॅनडा’ या कार्यक्रमात प्रसारित केले. टोरंटो येथील ‘आगाखान पॅलेस’ येथे हा माहितीपट प्रदर्शित झाला आहे. या भित्तीपत्रकात कालीमातेला सिगारेट ओढतांना दाखवले आहे आणि पाठीमागे ‘एल्.जी.बी.टी. ग्रुप’ या समलैंगिकतेचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेचा झेंडा आहे. लीना या कट्टर हिंदुद्वेष्टे प्रसारमाध्यम ‘अल्ट न्यूज’चे संपादक महंमद जुबैर यांच्या समर्थक आहेत. ‘पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले, तर मी माझी शिधापत्रिका आणि सर्व ओळखपत्रे रहित करीन’, अशा आशयाचे ट्वीट मणीमेकलई यांनी फार पूर्वी केले होते. त्यांची ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे यातून त्यांचा हिंदुद्वेष लक्षात येईल. विदेशात राहून भारतीय वंशाच्या हिंदूंनी भारतीय संस्कृती, देवता आणि हिंदु धर्म यांचे विविध माध्यमांद्वारे विडंबन केल्याच्या घटना अधून मधून उघडकीस येत असतात. अमेरिकास्थित चित्रकार नीना पालेय यांनी मध्यंतरी रामायण आणि सीतामाता यांच्या संदर्भातील अत्यंत अश्लाघ्य चित्रे काढली होती. हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर त्यांनी उद्दामपणे कालीमातेचे अधिकच अश्लाघ्य चित्र काढले. मध्यंतरी आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये (चित्रपटाच्या विज्ञापनासाठी बनवलेल्या व्हिडिओमध्ये) अभिनेते रणबीर कपूर यांनी पादत्राणे घालून देवीची आरती केली. त्या संदर्भातील तक्रारींवर काही कारवाई झाली नाही. हिंदुत्वनिष्ठांच्या दबावामुळे अनेक आस्थापनांनी त्यांची विज्ञापने मागेही घेतली आहेत; मात्र तरीही अनेक प्रकरणांच्या संदर्भात हिंदू निषेधाव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत. अभिनेते आमीर खान यांनी ‘पिके’ चित्रपटात ठायी ठायी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान केला; हिंदुत्वनिष्ठांनी याला वैध मार्गाने मोठा विरोध केला; पण संबंधितांना कुठे शिक्षा मात्र झालेली दिसली नाही. हिंदूबहुल भारतातील हिंदूंचा अशा प्रकारे देवता आणि धर्म यांच्या संदर्भात सातत्याने गेली ७० वर्षे विज्ञापने, चित्रपट, नाटके, चित्र आदी माध्यमांतून शेकडोंच्या संख्येने मानभंग होणे, हे चालूच आहे. हिंदूंच्या दृष्टीने हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. ‘कुणीही म.फि. हुसेन नावाच्या कलाकाराने यावे आणि हिंदूंच्या देवतांची अत्यंत अश्लील चित्रे काढावीत अन् हिंदूंनीच ती सहस्रो रुपयांना विकत घ्यावीत’, अशी स्थिती येथे होती. त्यांना विरोध करण्यासाठी हिंदूंना देशभरात एक, दोन नव्हे, तर १ सहस्र २०० तक्रारी प्रविष्ट कराव्या लागल्या.

हिंदूंच्या संदर्भात दिसणारा विरोधाभास !

भारतात अन्य पंथियांच्या संदर्भातील श्रद्धास्थानांविषयी काही विधाने करणे, ही जवळ जवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कुणी असे धैर्य केलेच, तर त्याला होणाऱ्या विरोधाचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, त्यानंतर भयानक दंगली, हिंदूंच्या निर्घृण हत्या यांची मालिकाच चालू होते. सामाजिक माध्यमे आणि देशभरातील वातावरण ढवळून निघते. सर्वाेच्च न्यायालयही हिंदूंच्या बाजूचा फारसा विचार न करता त्यावर टिप्पणी करते. नूपुर शर्मा प्रकरणी देश आणि हिंदू हे अनुभवत आहेत. किती प्रचंड विरोधाभास आहे हा ! नूपुर शर्मा प्रकरणी धर्मांधांनी दंगली आणि हत्या यांचे शस्त्र उगारले आहे. अजमेर शरीफ दर्ग्याचे खादीम (सेवक) सलमान चिश्त्ती यांनी नूपुर शर्मा यांना शिरच्छेदाची धमकी दिली आहे. चिश्ती यांचे नाव १३ हून अधिक हत्या आणि हत्यांचे प्रयत्न, तसेच कुप्रसिद्ध ‘अजमेर लैंगिक अत्याचारकांड’ यांच्याशी जोडले गेले आहे. शर्मा यांची बाजू घेणाऱ्यांना एक तर धमक्या मिळत आहेत किंवा त्यांची सरळ सरळ हत्या करण्यात येत आहे. शर्मा यांची बाजू घेणाऱ्यांची हत्या करण्याचे अनेक कट उघडकीस येत आहेत. इतकेच काय, बांगलादेशात ‘नूपुर’ नावाच्या गर्भवती स्त्रीलाही बलात्कार करून मारण्यात आले. एका विशिष्ट पंथियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली हिंदूंना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. उत्तरप्रदेशातील संभळ येथे देवतांची चित्रे असलेल्या कागदावर तालिब हुसेन हा दुकानदार चिकन विकत असल्याचे पुढे आले. या संदर्भात पोलीस त्याच्या दुकानात चौकशीला गेल्यावर त्यांच्यावर त्याने आक्रमण केले. हिंदूंच्या धर्मभावना दुखावून वर पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस अन्य धर्मियांत आहे. पाकमध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली फाशीची शिक्षाही घोषित करण्यात येते. ‘सॅमसंग’ आस्थापनाने ‘क्यूआर् कोड’ जारी केला. त्याद्वारे पैगंबर यांचे विडंबन झाल्याचे सांगत पाकमध्ये दंगल करण्यात आली. या प्रकरणी सॅमसंगच्या २७ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. भारतात मात्र हिंदूंच्या संदर्भात असे काही होत नाही; कारण हिंदू सहिष्णु आहेत.

 

हिंदूंच्या देवतांचे विडंबन थांबलेच पाहिजे !

कॅनडा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘काली’ माहितीपटाच्या भित्तीपत्रकाविषयी कॅनडातील ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात कळवले आहे आणि उच्चायुक्तालयाकडून कॅनडातील अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याविषयी लेखी विनंती केली आहे. देहली येथे मणीमेकलई यांच्या विरोधात दोन तक्रारी आतापर्यंत प्रविष्ट झाल्या आहेत. हिंदू आता श्रद्धास्थानांच्या विडंबनाचा वैचारिक स्तरावर विरोध करण्यासह कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तत्परतेने निषेध करू लागले आहेत, हे अलीकडील काही घटनांमधून लक्षात येते. हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचा विडा उचललेल्या हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कुठे ना कुठे आवाज उठवला जात आहे. हिंदू जागृत होत असल्याने हा पालट होत आहे. आता हिंदूंच्या ‘याला श्रद्धास्थानांचे विडंबन म्हणतात आणि यामुळे देवतांचा अवमान होतो’, हे लक्षात येऊ लागले आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र हिंदूबहुल भारतात प्रचंड बहुमताने निवडून आलेले हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना भारतात आणि जगभरात कुठेही हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस कुणाला होता कामा नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

जगभरात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशी स्थिती भारत सरकारने निर्माण करावी !