प्रांजळपणा आणि सकारात्मकता असलेले चि. चेतन देसाई अन् सेवेची तीव्र तळमळ असलेल्या चि.सौ.कां. शिवानी शिंदे !

प्रांजळपणा आणि सकारात्मकता असलेले चि. चेतन देसाई अन् सेवेची तीव्र तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. शिवानी शिंदे !

आषाढ शुक्ल षष्ठी (५.७.२०२२) या दिवशी कराड (जिल्हा सातारा) येथील चि. चेतन देसाई आणि सातारा येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची चि.सौ.कां. शिवानी शिंदे यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्या दोघांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. चेतन देसाई
चि.सौ.कां. शिवानी शिंदे

 

 

 

 

 

 

चि. चेतन देसाई आणि चि.सौ.कां. शिवानी शिंदे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!

१. चि. चेतन देसाई यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१ अ. सौ. नीला देसाई (आई), कराड, जिल्हा सातारा.

१. ‘चेतनमध्ये व्यवस्थितपणा आहे. तो त्याच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतो.

२. माझ्याकडून झालेली चूक तो मला सांगतो.’

१ आ. श्रीमती माया शिंदे (भावी सासूबाई (चि.सौ.कां. शिवानी यांची आई)), सातारा

१ आ १. प्रांजळपणा : ‘वर्ष २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा झाला. या सोहळ्यासंदर्भातील एक सेवा श्री. चेतन यांच्याकडे होती. ही सेवा पूर्ण झाल्यावर त्यांनी स्वतःच्या चुका ५ टप्प्यांत (चूक, स्वभावदोष, परिणाम, उपाय आणि प्रायश्चित्त) लिहून दिल्या. त्यांनी सत्संगात प्रांजळपणे चुका सांगून त्यांविषयीचे त्यांचे चिंतनही सांगितले.’

१ इ. सौ. मीरा मदन सावंत, कराड, जिल्हा सातारा.

१ इ १. समंजस

अ. ‘चेतन लहानपणापासूनच शांत, समजूतदार आणि संयमी स्वभावाचा आहे. महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी यांच्या निमित्ताने तो घरापासून दूर रहात होता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी असतांना त्याने कुठल्याही गोष्टींसाठी कधी हट्ट केला नाही. तो आहे त्या परिस्थितीत रहायचा. त्याने कुटुंबियांकडून अधिक अपेक्षा न ठेवता स्वतःच दायित्वाने बऱ्याच व्यावहारिक गोष्टी लवकर शिकून घेतल्या.

आ. नोकरी करायला लागल्यानंतर सध्याची मुले पैशांची अनावश्यक उधळपट्टी करतात; परंतु चेतनने तसे कधीही केले नाही. तो कुठलीही कृती संयम ठेवून आणि विचारपूर्वक करतो.

इ. तो त्याच्या लहान भावाशी अधिकाराने न वागता वडिलांप्रमाणे सर्वं गोष्टींसाठी त्याला सहकार्य करतो आणि सांभाळून घेतो.

१ इ २. तो कोणतीही सेवा मन लावून आणि परिपूर्ण करतो.’

१ ई. श्री. मदन तानाजी सावंत, कराड, जिल्हा सातारा.

१ ई १. सकारात्मकता : ‘सेवा करत असतांना किंवा दैनंदिन जीवनात कुठलीही नकारात्मक गोष्ट घडली, तरी चेतनदादा त्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो आणि समोरच्यालाही सकारात्मक ठेवतो. तो नेहमी कुठलीही गोष्ट किंवा प्रसंग यांची सकारात्मक बाजू पहातो.

१ ई २. साधकांपैकी कुणाला काही अडचण असेल, तर दादा लगेच त्यांना साहाय्य करतो.

१ ई ३. चेतनदादा पुण्यात बी.एस्.सी.चे शिक्षण घेत असतांना आणि आता घरी आल्यावरही नियमितपणे भावपूर्ण नामजप आणि प्रार्थना करतो.

१ ई ४. सेवेची ओढ : सध्या चेतनदादा चांगल्या पदावर नोकरी करतो, तरीही तो प्रत्येक रविवारी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा करतो. त्याला कुठलीही सेवा सांगितली, तरी तो ती सेवा करायला सिद्ध असतो. एखादा उपक्रम असेल, तर तो सुटी घेऊन ती सेवा करतो.’

१ उ. कु. भक्तराज मदन सावंत (वय १२ वर्षे), कराड, जिल्हा सातारा.

१. ‘चेतनमामा नेहमी ‘मला काय आवडते ?’, यापेक्षा ‘मला काय आवश्यक आहे ?’, याविषयी बोलतो.’

२. चि.सौ.कां. शिवानी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. श्रीमती माया शिंदे (आई), सातारा

२ अ १. झाडे आणि पक्षी यांच्यावर प्रेम करणे

२ अ १ अ. बागेतील झाडांची प्रेमाने काळजी घेणे : ‘शिवानी बागेतील झाडांशी प्रेमाने बोलते. झाडांकडे पहातांना मला वाटते, ‘ती श्वास घेत आहेत, असे जाणवते.’ बागेत फुलपाखरे आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढले आहे.

२ अ १ आ. पक्ष्यांविषयीचा प्रेमभाव ! : शिवानी ज्या खोलीत सेवेला बसते, त्या खोलीतील खिडकीत पक्षी येतात. सकाळी जोपर्यंत शिवानी खोलीतून उठून बाहेर जात नाही किंवा पक्ष्यांशी बोलत नाही, तोपर्यंत ते किलबिलाट करतात. शिवानी बाहेर गेल्यानंतर ते निघून जातात. जणू त्यांना तिच्याशी बोलायचे असते. त्यांची ही जवळीक पाहून ‘त्यांना एकमेकांचे बोलणे कळत असेल’, असे मला वाटते. अनेकदा खिडकीजवळ भारद्वाज पक्षी येतात. शिवानीला पाहिल्यावर ते घाबरत नाहीत; उलट तिथेच काही काळ थांबतात.

२ अ २. उत्तम नियोजनकौशल्य

अ. मागील वर्षी दळणवळण बंदीमध्ये तिने तेलाचे डबे कापून त्यांत फळभाज्या लावल्या. तिने पावटा, बटाटा, वांगी, मिरची, टोमॅटो, गवती चहा आणि कारल्याचा वेल लावला होता. उन्हाळ्यातही बाग हिरवीगार दिसायची. यानंतर अनेक दिवस बाजारातून भाजी आणण्याची आवश्यकताच पडली नाही.

आ. जून २०२१ मध्ये मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी मला १ मास पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. तेव्हा १ मास घरातील सर्व कामे, माझे औषध आणि पथ्यपाणी सांभाळून तिने तिच्याकडील सर्व सेवाही पूर्ण केल्या.

. घरात आम्ही दोघीच आहोत. विवाहाच्या अनुषंगाने खरेदी किंवा अन्य सिद्धता करतांना बरीच कामे तिलाच करावी लागत आहेत. हे करतांना ‘सेवाच करत आहे’, असा तिचा भाव असतो. दिवसभर सेवा आणि सायंकाळी ७ नंतर बाहेरील कामे करून ती सेवा आणि काम याचा योग्य समतोल राखते. त्यामुळे कुठलाही ताण जाणवत नाही. ती दुसऱ्या दिवशी करावयाच्या सेवा आणि कामे यांचे आदल्याच दिवशी  चिंतन करून ठेवते. त्यामुळे सारे काही वेळेत होते.

२ अ ३. आईला दुचाकी शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे : मागील वर्षी शिवानीने ‘तू दुचाकी गाडी शिक’, असा हट्टच केला; पण मला सायकलही चालवता येत नाही. ‘दुचाकी शिकणे’, ही माझ्या आयुष्यातील अशक्यप्राय गोष्ट होती. दुचाकी शिकण्यासाठी तिने मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी या वयातही गाडी चालवायला शिकले.

२ अ ४. तत्त्वनिष्ठ : माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा शिवानी घेते; पण आई म्हणून ती मला कधीच सवलत देत नाही. प्रेमाने किंवा प्रसंगी कठोर होऊन ती मला व्यष्टी साधना करण्यासाठी प्रोत्साहित करते.

२ अ ५. आधार देणे : मला कधी कशाचा ताण आला असेल, तर ती माझी मुलगी असूनही मी तिला सर्वकाही सांगू शकते. तिच्याशी बोलल्यावर माझा ताण न्यून होतो. त्यामुळे मला तिचा आधार वाटतो.’

२ आ. सौ. नीला देसाई (भावी सासूबाई, चि. चेतन यांची आई), कराड, जिल्हा सातारा.

१. ‘मला सेवेत काही साहाय्य लागल्यास ती तत्परतेने साहाय्य करते. ती सर्व सेवा वेळेत पूर्ण करते.’

२ इ. सौ. दिशा संतोष कदम आणि श्री. मंगेश निकम, सातारा

२ इ १. ‘शिवानीताईचे चालणे, बोलणे किंवा रहाणीमान यांत पुष्कळ चैतन्य जाणवते.

२ इ २. ती प्रत्येक व्यक्तीशी प्रांजळपणाने बोलते.

२ इ ३. सेवेची तीव्र तळमळ : ती प्रत्येक सेवा करतांना त्यातील बारकावे लक्षात घेऊन देवाला अपेक्षित अशी सेवा करते. त्यासाठी कितीही त्रास झाला, तरी ती परिपूर्ण सेवा करते.’

२ ई. सौ. अस्मिता सूर्यकांत देशमुख, सातारा

२ ई १. साधकांची व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी प्रयत्न करणे : ‘शिवानी आम्हा साधकांमध्ये वयाने लहान आहे, तरी ती आमची आईप्रमाणे काळजी घेते. ‘आमची व्यष्टी साधना चांगली होऊन आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी ती आम्हाला सतत वेगवेगळे उपाय सांगत असते.’

२ उ. सौ. विद्या कदम आणि सौ. माधुरी दीक्षित (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सातारा

१. ‘शिवानी सेवा पूर्ण होईपर्यंत चिकाटीने आणि तळमळीने प्रयत्न करते.’

२ ऊ. सौ. मीरा मदन सावंत, कराड, जिल्हा सातारा.

२ ऊ १. मायेपेक्षा साधनेकडे अधिक कल असणे : ‘शिवानीने लहान वयातच तिच्या साधनेची घडी नीट बसवली आहे. व्यावहारिक प्रगतीपेक्षा आध्यात्मिक उन्नतीकडे तिचा कल आहे. ती इतर साधकांकडून चांगल्या प्रकारे सेवा होण्यासाठी प्रयत्न करवून घेते. ती नेमकेपणाने बोलते. ती कुठेही अनावश्यक वेळ वाया घालवत नाही.’

२ ए. श्रीमती लता झांजुर्णे, गोडोली, जिल्हा सातारा.

२ ए १. साधकांना साधनेत साहाय्य करणे : ‘शिवानीला एखादा प्रसंग किंवा आध्यात्मिक त्रास यांविषयी सांगितल्यावर ती त्यावर चांगले दृष्टीकोन देऊन लगेच उपाय सुचवते. त्यामुळे तिच्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या साधकांनाही तिचा आधार वाटतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.६.२०२२)