कन्हैयालाल यांच्या हत्येत आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची राजस्थान पोलिसांची माहिती

कन्हैयालाल(डावीकडे ) यांचे मारेकरी रियाज अन्सारी आणि महंमद गौस

उदयपूर (राजस्थान) – येथील कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांच्यासह त्यांचे आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना अन्वेषणामध्ये मिळाली आहे. त्यातील मोहसीन खान आणि आसिफ हुसेन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर तिसर्‍या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अन्वेषणामध्ये रियाज आणि गौस यांनी मोहसीन अन् आसिफ यांची नावे उघड केली.

१. मोहसीन आणि आसिफ हे रियाज अन् गौस यांना वेगवेगळ्या दुचाकीवरून मालदास रस्त्यावर घेऊन गेले होते. मोहसीन आणि आसिफ हे दोघे आक्रमणाच्या वेळी रियाज अन् घौस यांना कुणी पकडल्यास त्यांना वाचवण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी तलवार, तसेच खंजीर यांच्याद्वारे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत उभे होते.

२. कन्हैयालालच्या हत्येसाठी आरोपीने २६११ क्रमांकाच्या दुचाकीचा वापर केल्याने ‘२६/११ च्या आक्रमणाशी आरोपींचा संबंध आहे का ?’, याचेही अन्वेषण करण्यात येणार आहे.

३. कन्हैयालालची रेकी करणार्‍या अन्य ७ संशयितांचे अन्वेषण चालू आहे, त्यातील ३ चित्तोडगड, तर अन्य ५ संशयित उदयपूर आणि राजसमंद येथील आहेत. या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत. यामध्ये २४ जून या दिवशी कन्हैयालाल यांना धमकी देणार्‍या एका महिलेचाही समावेश आहे.