तालिबानी पद्धतीने हिंदूंची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी !

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ (सिंधुदुर्ग), ३० जून (वार्ता.) – उदयपूर, राजस्थान येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांत प्रसारित केली, या कारणासाठी कन्हैयालाल तेली या शिवणकाम करणार्‍या ४० वर्षीय व्यक्तीची शिरच्छेद करून अतिशय क्रूरपणे २ धर्मांध मुसलमान व्यक्तींनी निर्घृण हत्या केली. त्यांनी हत्येचे दायित्व स्वीकारून घटनेचा व्हिडिओही प्रसारित केला. नूपुर शर्मा यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना धर्माधांकडून स्वत: कायदा हातात घेऊन असे कृत्य या देशात होते, ही धक्कादायक गोष्ट आहे. अशा प्रकारे तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार अमोल फाटक यांच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहखाते यांना देण्यात आले.

कुडाळचे तहसीलदार अमोल फाटक यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ही हत्या कोणा एका व्यक्तीची हत्या नसून तो हिंदु धर्मावर केलेला आघात आहे. यातील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. ती मिळाली नाही, तर असे प्रकार या देशात ठिकठिकाणी घडतील आणि त्यामुळे समाजातील शांतता अन् सुव्यवस्था बिघडेल. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी जलद गती न्यायालयाद्वारे होऊन गुन्हेगार २ धर्मांध मुसलमान आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.

या वेळी सर्वश्री विवेक पंडित, गुरुदास प्रभु, केशव माडये, प्रकाश बरगडे, किशोर सरनोबत, प्रथमेश परब, घनश्याम परब, प्रवीण सावंत, माधवजी भानुशाली, उदय आईर, दैवेश रेडकर, साई प्रसाद मसगे, रमाकांत नाईक, प्रथमेश धुरी, राज वारंग, प्रकाश प्रभु आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.