अलमट्टी धरणातील पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय !

कोल्हापूर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरणार्‍या अलमट्टी धरणातील पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय २७ जून या दिवशी ४ राज्यांतील अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही बैठक घेतली.

१. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या जलसंपदा, जलसंधारण विभागाचे सचिव, संबंधित राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आदींसह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीसाठा आणि विसर्गाचे वेळापत्रक आदींसह पूरनियंत्रणाविषयी केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती या वेळी देण्यात आली.

२. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती गंभीर होण्यास अलमट्टी धरणातील सुमारे ४० टी.एम्.सी. पाणीसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे धरणाच्या क्षमतेपेक्षा ४० टी.एम्.सी. पाणीसाठा ऑगस्टपर्यंत न्यून ठेवल्यास महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य होते. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे.