रायपूर (छत्तीसगड) येथील ‘बेली डान्स’चा कार्यक्रम बजरंग दलाने उधळला !

रायपूर (छत्तीसगड) – येथील ‘हॉटेल सयाजी’मध्ये ‘बेली डान्स’ हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे उधळून लावला. २४ जून ते ३ जुलै या कालावधीत ‘बॅटल ऑफ बेली डान्सर्स’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य कार्यक्रमासाठी विदेशातून नर्तकांना बोलावण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतरही हा कार्यक्रम आयोजित केल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोचले. त्यांनी घोषणाबाजी करून हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर हॉटेल व्यावसायिकांना तात्काळ पोलिसांना बोलवावे लागले. या वेळी पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम बंद करण्यात येत असल्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर प्रकरण मिटले.

‘बेली डान्स’ म्हणजे काय ?

‘बेली डान्स’ हा प्राचीन नृत्यप्रकार आहे. शतकानुशतके मध्य पूर्वेतील विवाहसोहळे आणि मेजवान्या यांमध्ये हे नृत्य केले जाते. ‘बेली डान्स’मध्ये कलाकार तोकडे कपडे घालून नृत्य करतात.