सोलापूर, २८ जून (वार्ता.) – सध्या सरकार अस्थिर असल्याने प्रशासन आणि अधिकारी यांचे वारीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. आळंदी ते पुणे, सासवड ते जेजुरी या मार्गात पोलीस काम करत होते का ?, असा प्रश्न पडला होता. वारीच्या मार्गात सुलभ शौचालयांची संख्या पुष्कळ अल्प होती, तसेच ते स्वच्छ नव्हते. कृपया वारीमध्ये असलेल्या वारकरी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मार्गावरील स्वच्छता, सक्षम वाहतूक व्यवस्था अशा अन्य मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात संगणकीय पत्राद्वारे पाठवले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून ऐतिहासिक वारसा जपणारी परंपरा आहे. यंदा २ वर्षांनंतर वारी होत असल्याने गर्दी पुष्कळ वाढली आहे. आषाढी वारीसाठी वारकरी भाविकांची पंढरपूर येथे जाण्याची व्यवस्था करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.