ठाणे, २५ जून (वार्ता.) – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फलक (बॅनर) लावले असतांनाच, त्यापाठोपाठ २५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या. समर्थकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फलकांसह ‘शिवसेना’ नावाचा उल्लेख असलेले आणि ‘धनुष्यबाणा’ची निशाणी असलेले झेंडे हातात धरले होते.
या वेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गाडीवर उभे राहून समर्थकांशी संवाद साधला. लुईसवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच रस्ते बंद केले होते.
ठाणे येथे जोरदार पाऊस चालू असतांनाही अशा परिस्थतीत शिंदे यांचे समर्थक पावसात भिजून घोषणा देत होते. विविध भागातून शिंदे समर्थकांचे समूह या ठिकाणी येत होते. ठाणे येथील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. माजी महापौर, तसेच ठाणे जिल्हा महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे यांचीही या ठिकाणी उपस्थिती होती.