ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश !

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे, २५ जून (वार्ता.) – ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यभरात शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे येथे कधीही शिंदे यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.