दोन तरुण मद्यपान करत शिवलिंगावर बियर ओतत असल्याचा व्हिडिओ प्रसारित

चंडीगड – सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात एका नदीच्या किनार्‍यावर दोन तरुण मद्यपान करत आहेत. येथे एक शिवलिंग आहे. या शिवलिंगावर हे तरुण बियर ओतत आहेत आणि त्या वेळी पार्श्‍वसंगीत म्हणून भगवान शंकराविषयीचे गाणे ऐकायला येत आहे. या दोघांपैकी एक युवक चंडीगडच्या सेक्टर २६ येथील रहाणारा आहे. या प्रकरणी हिंदु परिषद या संघटनेकडून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या संघटनेचे गिरी पंचानन म्हणाले की, आम्ही देवतांचा अवमान सहन करणार नाही. जर पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

पोलिसांनी सांगितले की, या व्हिडिओविषयी तक्रार मिळाली आहे. आमच्याकडेही हा व्हिडिओ पोचला आहे. याविषयी सायबर शाखेकडून चौकशी केली जात आहे. चौकशी नंतर आरोपींच्या विरोधात कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

भारतात फाशीची शिक्षा असणारा ईशनिंदेसारखा कठोर कायदा नसल्याने कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो अन् मोकाट रहातो ! आतातरी केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !