‘नेत्र म्हणजे शरिराच्या ‘नवद्वारां’पैकी दोन ‘द्वारे’ आहेत. नेत्र तेजतत्त्वाशी संबंधित असल्याने त्या द्वारांकडून व्यक्तीमधील स्पंदने शक्तीच्या स्वरूपात क्षेपित होत असतात. यामुळे योग्य साधना करणाऱ्या आणि सूक्ष्मातील स्पंदने जाणू शकणाऱ्या साधकाला एखाद्या व्यक्तीच्या नेत्रांकडे बघून तिची आध्यात्मिक स्थिती, म्हणजे तिला आध्यात्मिक त्रास आहे कि नाही ?, तिचा भाव, तिची साधना इत्यादी सहजतेने लक्षात येऊ शकते. सर्वसामान्य व्यक्तीला समाजातील वाईट शक्तींचा त्रास असलेल्या व्यक्तीकडे किंवा तथाकथित संतांकडे बघून त्यांची आध्यात्मिक स्थिती लक्षात येत नाही. याउलट चांगली साधना असलेल्या साधकाला व्यक्तीच्या डोळ्यांकडे काही वेळ पाहिल्यावर तिची आध्यात्मिक स्थिती सहजतेने लक्षात येते. अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र असल्याने आपणही डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची स्थिती कळण्याच्या संदर्भात अनुभूती घेऊ शकता. त्यासाठी सूक्ष्मातील पुढील प्रयोग करावा.
सूक्ष्मातील प्रयोग
पुढे दिलेल्या दोन व्यक्तींच्या डोळ्यांच्या छायाचित्रांकडे एकेक करून सलग १ – २ मिनिटे बघावे. दोन्ही छायाचित्रांकडे बघून ‘काय जाणवते ?’, याचा अभ्यास करावा. दोन्ही व्यक्तींच्या डोळ्यांकडे बघून आलेल्या अनुभूती एका कागदावर लिहाव्यात आणि त्यानंतर खाली दिलेले उत्तर पहावे. |
सूक्ष्मातील प्रयोग करून नंतरच खालील उत्तर वाचावे.
सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर
छायाचित्र क्रमांक १ मधील डोळ्यांकडे पहातांना त्रासदायक अनुभूती येणे, तर छायाचित्र क्रमांक २ मधील डोळ्यांकडे पाहून उच्च स्तराच्या चांगल्या अनुभूती येणे
डोळ्यांचे छायाचित्र (छायाचित्र क्रमांक १) एका संतांचे आहे. या संतांच्या डोळ्यांकडे बघतांना डोके जड होणे, ‘डोळ्यांकडे पाहू नये’, असे वाटणे, डोके गरगरणे, पोटात मळमळणे इत्यादी त्रासदायक अनुभूती येतात. त्यांना वाईट शक्तींचा त्रास आहे. या संतांच्या डोळ्यांच्या छायाचित्राची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यु.ए.एस्.)’ या उपकरणाने चाचणी केली असता, त्यांच्या डोळ्यांतून नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
डोळ्यांचे छायाचित्र (छायाचित्र क्रमांक २) सनातन संस्थेचे संत सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचे आहे. या संतांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे या संतांच्या डोळ्यांकडे बघतांना ‘त्यांच्याकडे सतत बघत रहावे’, असे वाटणे, हलकेपणा जाणवणे, शांत वाटणे इत्यादी चांगल्या अनुभूती येतात. या संतांना वाईट शक्तींचा त्रास नाही. या संतांच्या डोळ्यांच्या छायाचित्राची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यु.ए.एस्.)’ या उपकरणाने चाचणी केली असता त्यांच्या डोळ्यांतून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
छायाचित्र क्रमांक १ आणि छायाचित्र क्रमांक २ यांच्या प्रभावळीची तुलनात्मक सारणी
संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !
१. आध्यात्मिक स्थिती डोळ्यांतून लगेच लक्षात येत असणे
डोळ्यांच्या प्रयोगातून लक्षात येते की, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघून तिला असणारा आध्यात्मिक त्रास लगेचच लक्षात येतो. व्यक्तीचे डोळे हे मनाचा आरसा असतात. (Eyes are mirror of soul.) त्यामुळे व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर तिच्या मनातील विचार आणि भाव हेही आपल्याला कळू शकतात.
२. साधना केल्याने आध्यात्मिक त्रास दूर करता येणे शक्य !
एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असला, तरी तिला तो त्रास घालवता येतो. त्यासाठी तिला साधना करणे, सत्प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या, म्हणजेच संतांच्या सत्संगात रहाणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे आणि ईश्वराला अपेक्षित असणाऱ्या समष्टी कार्यात, म्हणजेच समाजाचा पारलौकिक उद्धार होण्यासाठी करावयाच्या कार्यात सहभागी होणे, त्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करणे, असे प्रयत्न करावे लागतात. तसे केल्यास ईश्वराची कृपा होऊन त्या व्यक्तीचा आध्यात्मिक त्रास दूर होतो.
२ अ. संतांच्या केवळ अस्तित्वानेही आध्यात्मिक त्रास दूर होऊ शकत असणे : एखाद्या अंधाऱ्या खोलीत तुपाचा दिवा लावला असता, त्या खोलीतील अंधार तर दूर होतोच आणि त्याशिवाय खोलीतील त्रासदायक स्पंदनेही दूर होऊन तिथे चांगली स्पंदने निर्माण होतात. त्याचप्रमाणे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीने उच्च कोटीच्या संतांच्या सान्निध्यात राहून त्यांची कृपा संपादन केल्यास तिचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चैतन्यमय असलेल्या संतांच्या अस्तित्वाने किंवा त्यांच्या एका कटाक्षानेही व्यक्तीत चांगला पालट होतो. असे संतसहवासाचे महत्त्व आहे.
२ आ. साधनेसाठी आध्यत्मिक कार्य करणाऱ्या आश्रमांत राहिल्यानेही आध्यात्मिक त्रास दूर होणे : आध्यात्मिक कार्य करणाऱ्या संतांच्या एखाद्या आश्रमात किंवा मठामध्ये साधनेसाठी राहिल्यासही तेथील चैतन्यामुळे एखाद्या व्यक्तीत चांगला पालट होऊ शकतो. सनातनचा आश्रम हे ईश्वरी चैतन्याने ओतप्रोत भरलेले असेच एक ठिकाण आहे. तेथे साधना करण्याची प्रेरणा मिळते, तसेच साधनेच्या दृष्टीने समष्टी कार्य करण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शनही लाभते. याचा लाभ कसा होतो, हे पुढील उदाहरणातून स्पष्ट होईल.
३. एका प्रवचनकारांवर सनातनच्या आश्रमातील चैतन्याचा आणि समष्टी कार्यातसहभागी झाल्याचा झालेला चांगला परिणाम
‘१७.८.२०१९ या दिवशी एक प्रवचनकार सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आले असतांना त्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यु.ए.एस्.)’ या उपकरणाने चाचणी करण्यात आली. त्या वेळी त्यांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १४.३८ मीटर होती. त्यानंतर आश्रमात सलग ३ दिवस ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तर्फे ‘संगीत आणि वेद’, ‘संगीत आणि पुराण’, ‘संगीत आणि बीजमंत्र’ या विषयांवर त्यांची प्रवचने ठेवण्यात आली. त्यांनी संगीताच्या संदर्भातील काही प्रयोग केले, तसेच त्यांच्या आश्रमातील वास्तव्यात आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी धर्मकार्याच्या संदर्भात भेट घेतली. त्या प्रवचनकारांची आश्रमातून जाण्याच्या दिवशी पुन्हा ‘यु.ए.एस्.’ चाचणी केली असता, ‘त्यांच्यामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्या ऊर्जेची प्रभावळ १५.०८ मीटर आहे’, असे त्या चाचणीत आढळून आले.’
– सौ. प्रियांका गाडगीळ, डोंबिवली, जिल्हा ठाणे.
(ही चाचणी वर्ष २०१९ मधील असल्यामुळे ‘सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ’ यांच्या नावाचा उल्लेख ‘पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ’ असा करण्यात आला आहे.)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |