अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

  • ‘शमशेरा’ चित्रपटातून हिंदु धर्माचा अवमान !

  • सामाजिक माध्यमांतून चित्रपटाचा विरोध !

मुंबई – ‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटाचा ‘टीजर’ (संक्षिप्त स्वरूपातील विज्ञापन) प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते संजय दत्त यांना एक खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांचे नाव ‘शुद्ध सिंह’ असल्याचे दिसत आहे. या भूमिकेत त्यांचे रूप एका ब्राह्मण व्यक्तीसारखे आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आणि शेंडी ठेवण्यात आल्याचे अन् हातात चाबूक असल्याचे दिसत आहे. या रूपावरून या चित्रपटाच्या निर्मात्याचा सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे.

१. ट्विटरवरून अनेकांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या ट्वीट्स केल्या आहेत. यात एकाने म्हटले आहे की, संजय दत्त एखाद्या खलनायकाची भूमिका करत आहेत. यातून असे वाटते की, हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘हिंदूंचा द्वेष करणारा चेहरा’ पुन्हा पुढे येत आहे.

२. दुसर्‍या एकाने ट्वीटमध्ये केले आहे की, यापूर्वीही मी म्हणत आलो आहे की, ‘जाणीवपूर्वक धोरण ठरवून काढण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये नेहमीच टिळा लावणारा खलनायक असतो !’

संपादकीय भूमिका

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. केंद्रीय परीनिरीक्षण मंडळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना सरकारने याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन अशा चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे बंद करावे, अशीच हिंदूंनी मागणी आहे !