अमेरिकेतील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करा ! – हिंदु अमेरिकन फाऊंडेशन

मंदिरांतील वाढत्या चोर्‍यांचे प्रकरण

वॉशिंग्टन – अमेरिकेतील ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये हिंदूंच्या मंदिरांत वाढत असलेल्या चोर्‍यांच्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही केली आहे. संघटनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भात ट्वीट करतांना न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि पेन्सिलव्हेनिया या राज्यांतील मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिरांमध्ये झालेल्या चोर्‍यांच्या घटना एकाच प्रकारे करण्यात आल्या आहेत. भक्तांची वर्दळ नसतांना काही महिलांचे गट ‘जिज्ञासू’ अथवा ‘भक्त’ असल्याचे भासवून मंदिरांमध्ये घुसत होेते. मंदिरांतील गाभार्‍यात जाऊन तेथील पुजारी अथवा कर्मचारी यांच्याभोवती गराडा घालून चाकूच्या धाकावर हे गट चोरी करत होते. न्यूजर्सी येथील मंदिराच्या ‘सीसीटीव्ही’मध्ये तर हिजाब घातलेल्या २ महिला मंदिरात घुसल्याचे समोर आले होते. यावर ‘फाऊंडेशन’ने  मंदिरांना आवाहन केले आहे की, त्यांनी मंदिरांच्या रक्षणाच्या संदर्भात कार्यपद्धत घालायला हवी, तसेच कर्मचारी आणि स्वयंसेवक यांना दर्शनासाठी येणार्‍यांची चौकशी करण्याचा अधिकार प्रदान करायला हवा.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? जी अमेरिका भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार वाढल्याची आवई उठवते आणि भारतविरोधी निराधार अहवाल बनवते, ती स्वत:च्या देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण का करत नाही ? आता भारताने अमेरिकेला यावर जाब विचारायला हवा !