गोव्यातील भूमी बळकावल्याची सर्व प्रकरणे विशेष अन्वेषण पथकाकडे सुपुर्द करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – भूमी बळकावल्याची सर्व प्रकरणे विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात यावीत, असा निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील पोलीस ठाण्यांना दिला आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘जे कुणी या प्रकरणांत सहभागी असतील, त्यांचे अन्वेषण केले जाईल. या प्रकरणांत ३-४ शासकीय अधिकारी सहभागी आहेत आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करण्यात येईल. भूमी बळकावण्याशी संबंधित अनेक प्रकरणे विशेष अन्वेषण पथकासमोर येत आहेत. विशेष अन्वेषण पथक पहिल्या प्रकरणाच्या मुळाशी पोचण्यातच व्यस्त आहे. काही प्रकरणांतील शासकीय प्रक्रिया एका दिवसातच पूर्ण करण्यात आली आहे.’’

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. त्यानंतर या पथकाने २ प्रकरणांचे अन्वेषण केले. पहिल्या प्रकरणात १८ जून या दिवशी विक्रांत शेट्टी यांना अटक केली. शेट्टी यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. म्हापसा पोलिसांनी वर्ष २०२१ पासून आतापर्यंतची २१ प्रकरणे विशेष अन्वेषण विभागाकडे सुपुर्द केली आहेत. विक्रम शेट्टी यांनी पोलिसांना त्याने जवळपास ६० ते ७० भूमी अनधिकृतरित्या विकल्या असून त्यासाठी त्यांना शासकीय अधिकार्‍यांचे साहाय्य मिळाल्याचे सांगितले आहे.

भूमी घोटाळ्याच्या तक्रारीसाठी ‘ऑनलाईन’ सुविधा

नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे

भूमी, संरक्षित क्षेत्रे किंवा पर्यावरण संवेदनशील भाग, अशा कोणत्याही ठिकाणची भूमी बळकावल्याच्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यम उपलब्ध करून दिले आहे. मंत्री राणे यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर भूमी बळकावल्याच्या प्रकरणाची पुरावा देणारी छायाचित्रे, तसेच कागदपत्रे पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. ‘गोव्याच्या सुंदर भूमीची नासधूस करणार्‍या गुन्हेगारांना समोर आणण्यासाठी सक्रीय भूमिका बजावा’, असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्टाचारग्रस्त भारत !
  • यात सहभागी उत्तरदायींकडून पैसे वसूल करा आणि उत्तरदायींना आजन्म कारागृहात टाका !