आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी १५ सहस्र लोकांसमवेत केला योगा

नवी देहली – भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, योग दिन आता जागतिक पर्व बनले आहे. योग हा जीवनाचा भाग नसून जीवनाचा एक मार्ग बनला आहे.

प्रत्येक वर्षी २१ जूनला योग दिनाची ‘थीम’ (विषय) ठरवण्यात येते. या वर्षी ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’, म्हणजेच ‘मानवतेसाठी योग’ असा विषय निवडण्यात आला होता. आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा विषय ठेवण्यामागचा उद्देश ‘कोरोनाकाळात शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करणार्‍या लोकांना दिलासा देणे’, हा आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय हा ‘योगा फॉर वेलनेस’, असा होता.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे !

१. आज योग मानवजातीला निरोगी जीवनाचा आत्मविश्‍वास देत आहे.
२. काही वर्षांपूर्वी अध्यात्मिक केंद्रांमध्ये दिसणारी योगाची चित्रे आता जगाच्या कानाकोपर्‍यांत दिसू लागली आहेत.
३. योगामुळे आपल्याला शांती मिळते. याचा अंगीकार केल्यास देशात आणि जगात शांतता नांदू शकते. याने आपल्या सर्वांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते.
४. आपण कितीही तणावात असलो, तरी काही मिनिटांच्या योगामुळे आपली सकारात्मकता आणि उत्पादकता वाढते. आपल्यालाही योग साधायचा आहे.

(चित्रावर क्लिक करा)

सैनिकांनी केले बर्फामध्ये सूर्यनमस्कार !

लडाखपासून छत्तीसगडपर्यंत आणि आसामच्या गौहत्ती ते सिक्कीमपर्यंत आयटीबीपीच्या (‘इंडो-तिबेटन बॉर्डर पुलिस’च्या) सैनिकांनीही योगासने केली. त्यांनी हिमाचल प्रदेशात १६ सहस्र, तर लडाखमध्ये १७ सहस्र फूट उंचीवर सूर्यनमस्कार केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे साजरा करण्यात आला योगदिन !

  • योग दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील नायगारा धबधब्याजवळ योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आणि अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते.
  • पाकमधील लाहोरमध्ये मुसलमान महिलांनी बुरखा घालून योग केला.
  • नेपाळची राजधानी काठमांडू येथे योग दिनाच्या पूर्वसंध्येला धरहरा टॉवर दिव्यांनी उजळून निघाला.

२१ जून हाच आंतरराष्ट्रीय योग दिन का ?

२१ जून या दिवशी योग दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठा दिवस आहे. त्याला ‘उन्हाळी संक्रांती’ असेही म्हणतात. भारतीय परंपरेनुसार उन्हाळ्याच्या संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे वळतो, तसेच या दिवशी योगा केल्याने लोकांचे आयुष्यही वाढते. हे लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी योग दिन साजरा केला जातो.