महिला वारकऱ्यांची कुचंबणा !

कोरोनाचे निर्बंध हटवल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. वारीमध्ये महिलांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा वारीच्या कालावधीत महिला वारकऱ्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

भक्तीरसात चिंब होऊन पुणेकर वारकरी सेवा करतात. खाण्यापिण्याची सेवा देणारे अधिक असतात; पण अन्य आवश्यक सुविधा मिळवणे पुष्कळ त्रासदायक आहे. सहसा अन्नदानाविना वारकऱ्यांचे इतर दायित्व घेतले जात नाही. त्यामुळे सहस्रो वारकरी महिलांना फूटपाथवरच रात्र काढावी लागते. रहायची सोय झाली, तर तिथे प्रसाधनगृह असेलच, असे नाही. एका महिलेने पहारेकऱ्याप्रमाणे जागे रहायचे आणि इतरांनी झोपायचे, असे करावे लागते. काही शाळांमध्ये सोय करण्यात येते; मात्र त्यांची संख्या पुष्कळच अल्प असते. थकून भागून महिला वारकरी रात्रीच्या वेळी दुकानांच्या इमारतींच्या पायऱ्यांवर स्थिरावल्यावर बऱ्याचदा त्यांना स्वच्छतागृहांची आवश्यकता भासते. अशा वेळी त्यांची कुचंबणा होते.

त्यामुळे बऱ्याच वेळेस पोटदुखीसारख्या समस्या उद्भवतात. दिंड्यांमध्ये पुरुष आणि महिला यांचा एकत्र समूह असतो. पुरुष उठण्यापूर्वीच महिला आधी उठून प्रातर्विधी उरकून घेतात. रात्री न्यूनतम आहार घ्यायचा, जेणेकरून अपरात्री स्वच्छतागृहात जायची वेळ येणार नाही, अशी तडजोड त्यांना करावी लागते. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये वारकऱ्यांच्या रहाण्याची सोय होते; मात्र खासगी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही या शाळा वारकरी सेवेत सहभागी होत नाहीत. अशा शाळांच्या जागा उपलब्ध झाल्यास वारकऱ्यांची गैरसोय टळू शकेल. महिला वारकऱ्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागणे, हे दुर्दैवी !

महिलांसाठी न्हाणीघरांची आणि अधिकाधिक फिरत्या स्वच्छतागृहांची सोय, स्तनदा मातांसाठी तात्पुरता निवारा शेड, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावल्यास महिलांची वारीही सुखकारक होईल ! त्यासाठी प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे