संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी झाली सज्ज !

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येत्या २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर या परिसरांतील अतिक्रमणे हटवली आहेत, त्यामुळे पालखी मार्ग रूंद झाले आहेत. इंद्रायणी नदीचा घाट, तसेच गावातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नगरपंचायत यांचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत.

गावातील विहिरी स्वच्छ करणे, हातपंपांची दुरुस्ती इत्यादी कामे चालू आहेत. तसेच पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. देहूत विविध ठिकाणी ८०० फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. वारीसाठी आलेल्या भाविकांना यंदा नगरपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आरोग्य किट्सचे वाटप करण्यात येणार आहे.