ग्रामसभेच्या विशेष ठरावाद्वारे श्रीक्षेत्र चाफळ (जिल्हा सातारा) येथील मांस विक्री बंद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !

सातारा, १९ जून (वार्ता.) – राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र चाफळ (जिल्हा सातारा) येथे काही मासांपूर्वी मांसाहारी पदार्थ विक्रीचे ‘चायनीज सेंटर’ चालू करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थ, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु एकता आंदोलन या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रखर विरोध करण्यात आला. याविषयी १३ जून या दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत एकमुखी ठरावाद्वारे श्रीक्षेत्र चाफळ मांसमुक्त करत असल्याचा अभिनंदनास्पद निर्णय घेण्यात आला.

१. श्रीक्षेत्र चाफळ येथे समर्थस्थापित प्रभु श्रीराम, श्रीवीर मारुति आणि श्रीदास मारुति यांची मंदिरे आहेत. शिवकाळापासून या मंदिरांमध्ये विविध सण, उत्सव, भजन, कीर्तन, प्रवचन आदी साजरे केले जातात; मात्र काही मासांपूर्वी मंदिरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर मांसाहारी चायनीज पदार्थ विक्रीचे दुकान चालू करण्यात आले होते.

२. त्याचा वास मंदिराच्या परिसरामध्ये पसरून मंदिरातील सात्त्विकतेवर परिणाम होत होता; मात्र राजकीय पाठबळ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यांमुळे दुकानदाराच्या विरोधात बोलण्याचे धाडस कुणीही करत नव्हते.

३. याविषयी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराशी संपर्क करून याची माहिती दिली. ३१ मे या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर सर्व सूत्रे गतीने फिरली. पाटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गोपनीय पद्धतीने चाफळ येथील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि हिंदु एकता आंदोलनचे कार्यकर्ते यांची चौकशी करत प्रकरण हाताळले. परिणामी चाफळ ग्रामप्रशासनाने नैतिक उत्तरदायित्व स्वीकारत १३ जून या दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. या विशेष ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेत श्रीक्षेत्र चाफळ मांसविक्री मुक्त करत असल्याचे घोषित करण्यात आले. या ग्रामसभेत विनोद काशिनाथ साळुंखे यांनी उपरोक्त सूचना मांडली, तर त्यास वसंतराव बाबूराव जाधव यांनी अनुमोदन दिले.

दैनिक सनातन प्रभात प्रती कोटी कोटी कृतज्ञता !

देव, देश अन् धर्मरक्षणासाठी कार्यतत्पर असणाऱ्या दैनिक ‘सनातन प्रभात’ने अत्यंत निर्भीडपणे हा विषय उचलून धरला. तसेच वेळोवेळी याविषयीचा पाठपुरावा घेऊन ग्रामस्थ, धारकरी आणि कार्यकर्ते यांना प्रेरणा दिली अन् मार्गदर्शनही केले. या यशामध्ये ‘सनातन प्रभात’चा मोलाचा वाटा असून आम्ही समस्त हिंदू दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रती कोटी कोटी कृतज्ञ आहोत, अशा शब्दांत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि धर्माभिमानी ग्रामस्थ यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे कौतुक !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि धर्माभिमानी ग्रामस्थ यांच्या सांघिक प्रयत्नांची परिणती म्हणजे हे यश आहे. कृतीशील राहून पोलीस आणि प्रशासन यांना श्रीक्षेत्र चाफळ मांसमुक्त करण्यास भाग पाडणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, हिंदु एकता आंदोलनचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी ग्रामस्थ यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.