मानवाचे गुण कालौघातही आपला ठसा उमटवत असणे !
काळाच्या अखंड महाओघात जी गोष्ट निर्विवादपणे तिचा अविस्मरणीय ठसा उमटवून गेली आहे, ती म्हणजे मानवी गुण ! विचारांचा प्रामाणिकपणा, त्यानुरूप आचार, सर्वांचे हित लक्षात घेऊन ठरवलेल्या ‘शिष्टाचारां’वर अटळ निष्ठा आणि स्खलनशील अशा नैसर्गिक प्रवृत्तीशी सतत झगडत रहाण्याची झुंजार वृत्ती हे मानवी गुण ज्या ठिकाणी एकत्र येतात, तेथे साकार होतो एक खराखुरा जिवंत माणूस ! त्याला असते स्वतःचे असे व्यक्तित्व आणि त्या व्यक्तित्वात असते परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य !
गुणी व्यक्ती कुठलीही आवाहने लीलया पेलू शकत असल्यामुळे जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकणे !
हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, ते युवक राजकारणात शिरले, तरी स्वार्थी असणार नाहीत. त्यांच्या समाजकारणात ढोंग रहाणार नाही. त्यांचे कार्यक्रम हे हवेतले मनोरे ठरणार नाहीत. खऱ्या कळवळ्याने केलेली मानवाची सेवा असे उदात्त स्वरूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.
हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, तो सर्वसामान्य युवकही स्वतःच्या क्षमतेप्रमाणे जीवनाच्या वास्तवाला सामोरा जाईल. स्वतःचे महत्त्व ओळखेल, स्वतःच्या क्षमता जाणून घेईल, स्वतःच्या मर्यादा लक्षात घेईल आणि जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकेल.’
– श्री. रवींद्र परेतकर (संदर्भ : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी १९७७)