आषाढी वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यांवर भर द्यावा ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

मिलिंद शंभरकर

सोलापूर – आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यांतून, तसेच इतर राज्यांतूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यांवर भर देण्याच्या सूचना अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत. नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाविषयी संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत मांडण्यात आलेली सूत्रे

१. नगरपालिका प्रशासनाने स्थानिक लोकसंख्या विचारात घेऊन भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करावा.

२. चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. तेथे मुबलक प्रमाणात शौचालयाची व्यवस्था करावी. तात्पुरती शौचालये उभी करून त्यांच्या स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी. वेळोवेळी पहाणी करावी.

३. अन्नपदार्थामध्ये भेसळ होणार नाही, याची अन्न आणि औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. ३ जुलैपासून शहरातील हॉटेल्स, प्रसाद दुकाने यांची वेळोवेळी पडताळणी करावी. दोषी आढळलेल्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत.

४. पंढरपूर शहर, पालखी मार्ग येथील औषध विक्री दुकाने दिवसरात्र चालू रहातील.

५. महावितरण आस्थापनाने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, शहरात अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. जलसंपदा विभागाने यात्रा कालावधीत भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याविषयी नियोजन करावे.

६. आवश्यक त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करावी.

७. वारी कालावधीत सर्व भ्रमणभाष ‘जॅम’ होतात. संपर्कासाठी ‘फोन’ची सुविधा खंडित होऊ नये, यासाठी ‘बीएस्एन्एल्’ने टॉवरची क्षमता वाढवून २१ ठिकाणी ‘हॉटलाईन’ सुविधा द्यावी.