६ राज्यांत निदर्शने आणि हिंसाचार
नवी देहली – केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्यदलांमध्ये सैनिकांची भरती करण्यासाठी ‘अग्नीपथ’ ही योजना घोषित केल्यानंतर तिला विरोध होऊ लागला आहे. बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे. या योजनेच्या निषेधार्थ हरियाणातील रोहतकमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, तर हरियाणाच्याच पलवलमध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांची ३ वाहने जाळली आहेत. बिहारमध्ये रेल्वेच्या ३ गाड्या जाळण्यात आल्या.
Agnipath Scheme Protest Live Updates: 7 राज्यों में हिंसक हुए प्रदर्शनकारी, बिहार में 3 ट्रेनें फूंकने के बाद नवादा में BJP ऑफिस को लगाई आग#AgnipathScheme | #Protesthttps://t.co/RGZ9wQgEkO
— Tv9Hindi (@tv9_hindi) June 16, 2022
१. बिहारच्या जहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या, तर छपरा अन् मुंगेर येथे रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. आंदोलक तरुणांनी १५ जूनला सकाळपासून सफियाबादजवळील पाटलीपुत्र-भागलपूर हा मुख्य रस्ता रोखून धरला, तर जहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी गया-पाटणा रेल्वे मार्ग अडवला, तसेच शहरात जाळपोळ केली.
२. उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर आणि उन्नाव येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी निदर्शक विद्यार्थ्यांची पोलिसांसमवेत झटापटही झाली. विद्यार्थी म्हणाले की, भारत सरकारच्या निर्णयाची आम्हाला लाज वाटते.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पोचण्यापूर्वी गागलमध्ये आंदोलन करणारे तरुण मोदी यांच्यासमोर आंदोलन करण्यासाठी धर्मशाळेत जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.
४. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये देहली-जयपूर महामार्ग रोखून धरण्यात आला. रस्त्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, ३ वर्षांपासून सैन्य भरती होत नव्हती. आता केवळ ४ वर्षांच्या नोकरीची योजना आणण्यात आली आहे. ही आमची फसवणूक आहे.
५. हरियाणातील रेवाडी येथील बसस्थानकाजवळ आंदोलकांनी गोंधळ घातला. तरुणांनी पोलिसांचे अडथळे तोडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ घालणार्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीमार करून पांगवले.
‘अग्नीपथ’ योजना काय आहे ?‘अग्नीपथ’ योजनेद्वारे तिन्ही सैन्यदलांत तरुणांची ४ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. या तरुणांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार आहे. यंदा ४६ सहस्र जणांची ‘अग्नीवीर’ म्हणून भरती केली जाईल. ही भरती ३ मासांत चालू होईल. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी मासिक वेतन ३० सहस्र रुपये मिळणार आहे. दुसर्या वर्षी ३३ सहस्र, तिसर्या वर्षी ३६ सहस्र ५०० आणि चौथ्या वर्षी ४० सहस्र रुपये वेतन मिळणार आहे. प्रत्येक सैनिकाला ११ लाख ७१ सहस्र रुपयांचा सेवानिधी मिळणार असून हे उत्पन्न करमुक्त असेल. तसेच त्यांना सेवाकाळात ४८ लाख रुपयांचे विमाकवचही मिळेल. ४ वर्षांनंतर निवृत्त झालेल्यांपैकी २५ टक्के सैनिकांना पुढे कायम ठेवले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे वर्ष २०३० पर्यंत सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय ३२ वरून २४ होईल. याआधी तिन्ही सैन्यात प्रतिवर्षी सुमारे ६० सहस्र सैनिकांची भरती व्हायची; कारण तितकेच सैनिक निवृत्त व्हायचे. येत्या १० वर्षांत तिन्ही दलांमध्ये अर्धे सैनिक हे अग्नीवीर असतील. वर्ष २०२२-२३ ची संरक्षण तरतूद ५ लाख २५ सहस्र कोटी रुपयांची आहे. यातील १ लाख १९ सहस्र कोटी रुपये केवळ निवृत्तीवेतनावर खर्च केले जातील आणि तेवढीच रक्कम वेतनावर खर्च केली जाईल. उर्वरित पैशातून सैन्याच्या गरजा भागवल्या जातील; मात्र अग्नीपथ योजनेमुळे निवृत्तीवेतन आणि वेतन यांच्यावरील खर्चाचा मोठा भाग वाचेल, जो सैन्याला चांगली शस्त्रे अन् तंत्रज्ञान देण्यासाठी खर्च करता येईल. |