धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, १५ जून (वार्ता.) – पैसे किंवा अन्य आमिषे दाखवून गोमंतकियांचे धर्मांतर करण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी राज्यात धर्मातरबंदी कायदाही लागू केला जाऊ शकतो, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही चेतावणी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘मी कधीही जाती-धर्मांत भेदभाव करत नाही. आमचे सरकार सर्वांना समान न्याय देते. सरकार सर्व घटकांचा विकास साधत असते. या परिस्थितीत कुणीही लोकांचे आमिषे दाखवून धर्मांतर करू शकणार नाही. यापुढे अशा कृत्यांना राज्यात अजिबात थारा दिला जाणार नाही, तरीही कुणी ऐकत नसेल, तर राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणावा लागणार आहे. हा कायदा आणण्यासाठी सरकार पातळीवर सिद्धता चालू आहे. कायदेतज्ञांची समिती या दृष्टीने इतर राज्यांत लागू केलेल्या धर्मांतरबंदी कायद्याचा अभ्यास करत आहे.’’

लोकांना दुर्धर आजारातून बरे करण्याची आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोपाखाली पोलिसांनी शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ चर्च चालवणारा बिलिव्हर्सचा पाद्री डॉम्निक डिसोझा, त्याची पत्नी जुआना मास्कारेन्हास आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या विरोधात हल्लीच गुन्हा प्रविष्ट केला आहे. पाद्री डॉम्निक डिसोझा याची जामिनावर सुटका झालेली आहे. या घटनेनंतर राज्यात धर्मांतराचे सूत्र चर्चेत आहे.

संस्कृतीचे जतन हे प्रत्येक सरकारचे आद्यकर्तव्य !

राज्यातील संस्कृतीचे जतन करणे, तसेच इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचवणे, हे प्रत्येक सरकारचे आद्यकर्तव्य आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. धर्मांमध्ये आम्ही कधी भेदभाव केलेला नाही. आम्ही केवळ हिंदूंचीच बाजू घेऊन पुढे जात असल्याची चर्चा पोकळ आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत या वेळी म्हणाले.