‘पंचतत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियंत्रणात आहेत’, या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या उद्गारांची साधिकेला आलेली प्रचीती !

सौ. क्षिप्रा जुवेकर

१. विमानतळावर विमानाची प्रतीक्षा करत असतांना सगळीकडे भगवंताचे अस्तित्व जाणवणे

९.१२.२०२१ या दिवशी आम्ही लखनौ विमानतळावर विमानाची प्रतीक्षा करत होतो. विमानतळावर सतत एक पाश्चात्त्य वाद्यसंगीत (Western Instrumental Music) लावलेले असते. मी विमानतळावर बसले असतांनाही ते चालू होते. तेव्हा सूक्ष्मातून भगवंताने मला विचारले, ‘तू आता कोणता भाव ठेवला आहेस ?’ तेव्हा मला असे वाटत होते, ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे. माझ्या शेजारच्या आसंदीवर बसून तो सर्वांकडे पहात आहे. सर्व लोक भगवंताचाच अंश आहेत आणि सर्वांमध्ये त्याचेच अस्तित्व आहे.’

पूर्वी माझ्या मनात असे विचार येत नव्हते; परंतु त्या दिवशी ईश्वरानेच मला हा भाव ठेवण्यास सुचवले.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘दैवी नादा’विषयी सांगण्यास आरंभ केल्यावर विमानतळावरील पाश्चात्त्य संगीत बंद होऊन बासरीचा नाद ऐकू येणे

त्या दिवशी मी माझ्या भ्रमणभाषवर गुरुवारी होणारा भक्तीसत्संग लावला होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीमातेने ‘दैवी नादा’विषयी सांगण्यास आरंभ केला होता. त्याच क्षणी विमानतळावर वाजणारे पाश्चात्त्य वाद्यसंगीत बंद होऊन त्या वाद्यसंगीतातून बासरीचा नाद ऐकू येऊ लागला. तो नाद ऐकताच मला अत्यंत कृतज्ञता वाटली. ‘श्रीकृष्णानेच मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव स्थुलातून करवून दिली आहे’, असे मला जाणवले.

३. बासरीच्या धूनमध्येच श्रीविष्णूची आरती चालू होऊन चैतन्य आणि आनंद जाणवणे अन् ‘संपूर्ण ब्रह्मांड श्रीविष्णुरूपी गुरुदेवांची आरती करत आहे’, असे वाटणे

त्यानंतर काही वेळ आम्ही भक्तीसत्संगात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे दैवी नाद ऐकू शकलो नाही. त्या वेळी बाहेर बासरीची धून चालूच होती. जसा भक्तीसत्संगातील दैवी नाद संपला, तसे बाहेरील वाद्यसंगीतातील बासरीच्या धूनमध्ये ‘ॐ जय जगदीश हरे ।’ ही श्रीविष्णूची आरती चालू झाली. ती ऐकतांना मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच राहिली नाही. मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवू लागला अन् ‘संपूर्ण ब्रह्मांड श्रीविष्णुरूपी गुरुदेवांची आरती करत आहे’, अशी मला अनुभूती आली.

४. भक्तीसत्संग समाप्त झाल्यावर पुनः पाश्चात्त्य संगीत चालू होणे

माझ्या मनात आले, ‘आणखी एकदा आरती ऐकली असती, तर बरे झाले असते.’ तेव्हा खरोखरच पुन्हा पाश्चात्त्य संगीताऐवजी आरती लागली. त्यानंतर काही वेळाने भक्तीसत्संग समाप्त झाला. त्यानंतर बासरीचा नादही बंद होऊन पुन्हा पाश्चात्त्य वाद्यसंगीत चालू झाले.

श्री गुरूंच्या कृपेमुळे आम्हाला अशी नादाची अनुभूती आली. भगवंताने नादाच्या माध्यमातून आमच्यावर कृपा केली.

५. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘पंचतत्त्वे श्रीगुरूंच्या नियंत्रणात असून ते कोणतीही परिस्थिती एका क्षणात पालटू शकतात’, असे सांगणे

आम्ही देहलीला पोचल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘पंचतत्त्वेच श्रीगुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) नियंत्रणात आहेत. ते कोणतीही परिस्थिती एका क्षणात पालटू शकतात’, असे यातून लक्षात येते.’’ श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

– सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव (२४.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक