काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये सरकारी नोकर्‍यांसाठी स्पर्धा परीक्षांची सिद्धता करणारे तरुण जिहादी आतंकवादी बनत आहेत, असे दिसून येत आहे. यापूर्वी एप्रिलपर्यंत सुरक्षायंत्रणांचा दावा होता की, खोर्‍यातील तरुण काश्मिरी युवक आतंकवादी बनण्याचे प्रमाण घटले आहे. जानेवारी ते एप्रिल या मासांमध्ये केवळ १४ तरुण आतंकवादी बनले; पण मे मासामध्ये प्रतिदिन तरुण गायब होऊन आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मे मासातच ३६ तरुण बेपत्ता झाले आहेत. ते १८-२५ वर्षांचे आहेत. कुटुंबियांनी बेपत्ता होण्याचे कारण लिहून दिले आहे; मात्र असे अनेक तरुण बेपत्ता आहेत, ज्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिलेली नाही. अशा स्थितीत तरुणांची आतंकवादी बनण्याची सूची मोठी होऊ शकते. या वर्षात आतापर्यंत सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत.

७ जून या दिवशी शोपिया येथे राजा नदीम राथर या आतंकवाद्याला ठार करण्यात आले. तो ‘बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स’च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. आतंकवादी बनलेल्या एका तरुण एन्.डी.ए.ची (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमीची) परीक्षा उत्तीर्ण झाला होता. कैसर अहमद डार हा विद्यार्थी इयत्ता बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच बेपत्ता झाला होता.

संपादकीय भूमिका

काश्मीरचा आतंकवाद हा जिहादसाठी असल्याने जोपर्यंत ‘जिहाद’ ही संकल्पना कायम आहे, तोपर्यंत काश्मीर येथीलच काय, तर जगातून इस्लामी आतंकवाद नष्ट होणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार आहे !