पुणे – रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापीच्या संदर्भात केलेले वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक वा संघाची भूमिका आहे, संपूर्ण भारताची नाही. औरंगजेबाने, मोगल आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यावर मशिदी बांधल्या, अतिक्रमण केले, हा इतिहास आहे. असे असतांना भारतातील मुसलमानांनी त्याचे समर्थन कशाला करायला हवे ? प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ज्ञानवापीमधील अविमुक्तेश्वरापासून ते धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेपर्यंत, तसेच विश्वातील
४० सहस्र मंदिरे ज्याच्यावर अतिक्रमण केले आहे, ते सर्व मुक्त व्हायला हवे, अशी हिंदूंची भावना आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. छत्तीसगड येथील ‘आयबीसी २४’ या वृत्तवाहिनीने ‘काशी विश्वेश्वराच्या संदर्भात मोहन भागवत यांनी केलेले विधान’ यासंबंधी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये श्री. घनवट बोलत होते. या वेळी संघ अभ्यासक श्री. दीपक शर्मा यांनीही सहभाग घेतला.