स्वत:मध्ये अंतर्गत परिवर्तन करणे म्हणजे खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

बोईसर (पालघर) येथील ‘फ्युचर ऑफिसर अकॅडमी’मधील युवकांना मार्गदर्शन !

डावीकडून सनातन संस्थेच्या सौ. सुशीला होनमोरे आणि बोलतांना समितीचे श्री. हेमंत पुजारे

बोईसर (जिल्हा पालघर) – व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपण शिकवणी घेऊन स्वतःत पालट करतो. समाजात आपण चांगले दिसावे, यासाठी प्रयत्न करतो; परंतु मातृभूमीच्या रक्षणासाठी सिद्ध होणार्‍या प्रत्येक युवक-युवतीने स्वतःमध्ये अंतर्गत परिवर्तन करणे हाच खर्‍या अर्थान व्यक्तिमत्त्व विकास आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. बोईसरमधील ‘फ्युचर ऑफिसर’ या अकॅडमीमधील स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्‍या युवक-युवतींसाठी अकॅडमीचे शिक्षक श्री. अतुलकुमार मोहंती यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व, ध्येय निश्चिती या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. या वेळी श्री. पुजारे बोलत होते. त्यांच्या समवेत सनातन संस्थेच्या सौ. सुशीला होनमोरे उपस्थित होत्या.

वैशिष्ट्यपूर्ण

१. ध्यानाला बसून श्री गणेशाचा जप करणे हा प्रयोग या वेळी घेण्यात आला. तेव्हा काहींना गणपतीची मूर्ती डोळ्यांसमोर दिसणे, नेहमीच्या ध्यानापेक्षा जास्त चांगले वाटणे असे अनुभवण्यास आले.

२. समितीच्या माध्यमातून उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराविषयी माहिती दिल्यावर युवकांनी ‘माहिती-अधिकार’अंतर्गत अर्ज कसा करावा ? याविषयी शिकवण्याची मागणी केली, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकण्याचीही इच्छा व्यक्त केली.

अभिप्राय

१. श्री. मयूर खैरनार – मनात अनेक प्रश्न असतात; पण ते विचारता येत नाहीत. येथे कार्यक्रमाच्या वेळी प्रश्न विचारता आल्याने चांगले वाटले.

२. कु. स्वाती बागडे – मांसाहाराचा साधनेवर कसा परिणाम होतो, हे सत्त्व, रज आणि तम याविषयीच्या माहितीमुळे समजले.