सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१४ जून २०२२ या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या समवेत अन्य साधकांकडून शिकण्यालाही महत्त्व देणे ’आणि ‘काळाच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास शिकवणे’ यांविषयी पाहिले. आज आपण अंतिम भाग पाहूया

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/587920.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

१८. जिज्ञासूंनी अध्यात्मातील विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे शोधण्यास सांगणे

दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘एस्.एस्.आर्,एफ’ या संकेतस्थळाचे वाचक यांनी अध्यात्मातील विविध विषयांवर नावीन्यपूर्ण प्रश्न विचारल्यास त्यांची उत्तरे सूक्ष्मातून शोधण्याची सेवा परात्पर गुरु डॉक्टर मला द्यायचे. हे प्रश्न पुढीलप्रमाणे असायचे, ‘विविध सूक्ष्म लोकांचे स्थान कुठे आहे ? काही विदेशी साधकांना सूक्ष्मातून विविध संख्या दिसायच्या. त्या संख्यांचा आध्यात्मिक अर्थ काय ?’ इत्यादी.

१९. साधना न करणाऱ्या व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातील ज्ञानातून न देण्याविषयी सांगणे

एकदा मी अन्य संतांच्या आश्रमात गेलो होतो. तेथे समाजातील साधना न करणाऱ्या एका व्यक्तीला मला सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याविषयी समजले होते, तेव्हा तिने मला विचारले, ‘‘मी तुम्हाला अध्यात्मातील काही प्रश्न विचारू शकतो का ?’’ तेव्हा ‘त्या व्यक्तीला उत्तर देऊन काही उपयोग होणार नाही’, असे मला जाणवले. मी तिला म्हणालो, ‘‘जेव्हा गुरु मला एखाद्या विषयावर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यास सांगतात, तेव्हाच मला ज्ञान मिळते अन्यथा नाही.’’

हा प्रसंग मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितला आणि विचारले, ‘‘मी त्या व्यक्तीला दिलेले उत्तर योग्य होते का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘योग्य केले. साधना न करणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तरी ती साधना करणार नाही. त्यामुळे त्यात आपला वेळ घालवायला नको.’’

श्री. राम होनप

२०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्माच्या तत्त्वाला धरून अभ्यास करण्यास शिकवल्याच्या संदर्भात घडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग

मला सूक्ष्मातून मिळत असलेल्या ज्ञानाचा एक लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या लेखातील काही सूत्रे न पटल्याने एका संतांना माझा राग आला होता आणि त्यांनी मला मिळालेल्या ज्ञानातील न पटलेल्या सूत्रांचे खंडण केले. त्या संतांनी एक संगणकीय धारिका करून माझ्या लेखातील त्यांना वाटत असलेल्या आक्षेपार्ह सूत्रांची नोंद करून मला पाठवली. ते संत ज्ञानमार्गी होते. ही धारिका वाचून ‘संतांना माझा राग आल्याने मला त्यांची क्षमा मागायला हवी’, असा विचार माझ्या मनात आला.

ही धारिका मी परात्पर गुरु डॉक्टरांना पाठवली आणि ‘याविषयी काय करायला हवे ?’ असे विचारले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘संतांनी तुझ्या ज्या सूत्रांविषयी आक्षेप घेतला आहे, त्या प्रत्येक सूत्राविषयी सूक्ष्मातून ज्ञान घे. संतांनी मांडलेला आक्षेप योग्य असल्यास तशी नोंद कर आणि तसे नसल्यास त्याचे सूक्ष्मातून कारण शोध.’’

हे ऐकून ‘परात्पर गुरु डॉक्टर तत्त्वनिष्ठ राहून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतात’, या जाणिवेने त्यांच्याविषयी माझ्याकहून कृतज्ञता व्यक्त झाली. मला मिळलेल्या सूक्ष्म ज्ञानात संतांनी ज्या सूत्रांचे खंडण केले होते, त्या प्रत्येक सूत्राविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून ज्ञान मिळवता आले. हे संपूर्ण ज्ञान योग्य आणि अध्यात्मशास्त्र यांना धरून होते.

या सूक्ष्मातील ज्ञानाची धारिका परात्पर गुरु डॉक्टरांना पडताळण्यास ठेवली. ही धारिका परात्पर गुरु डॉक्टरांना आवडली. त्यांनी ही धारिका त्या संतांना पाठवून त्यावर त्यांच्यासाठी पुढील निरोप दिला, ‘‘या धारिकेतून मला पुष्कळ शिकायला मिळाले.’’ त्यानंतर त्या संतांनी या विषयावर परत आक्षेप घेतला नाही.

२१. स्वतःला मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानापुरते मर्यादित न रहाता अन्य संतांकडूनही शिकण्यास सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर नेहमी सांगत, ‘अध्यात्मशास्त्र अनंताचे ज्ञान असल्याने सतत शिकत रहायला हवे.’ त्यामुळे त्यांनी मला मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानापुरते मर्यादित न रहाता सूक्ष्मातून जाणणाऱ्या अन्य संतांच्या भेटी घेण्याची सेवा दिली आणि त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले. असे केल्याने अन्य संतांमुळे अध्यात्मातील विविध पैलूंचा अभ्यास झाला. अन्य संतांकडील अफाट ज्ञानाची व्याप्ती पाहून तेव्हापासून ‘केवळ स्वतःलाच सूक्ष्मातील ज्ञान मिळते’, हा अहंयुक्त विचार मनात येत नाही.

२२. समाजातील आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या संतांचा अभ्यास करण्यास शिकवणे

सूक्ष्मातील ज्ञान असलेल्या संतांच्या भेटी घेण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. कालांतराने त्या संतांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली हाती. त्यांपैकी काही संतांना आध्यात्मिक त्रास आहे, तर काही संतांना नाही. याचा अभ्यास ‘संतांच्या छायाचित्रांतील स्पंदनांवरून कसा करायचा ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी मला शिकवले. या अभ्यासामुळे ‘त्रास नसलेल्या संतांचा आध्यात्मिक लाभ अथवा मार्गदर्शन घ्यायला हवे आणि त्रास असलेल्या संतांपासून सावध रहायला हवे, हे ठरवणे सुलभ गेले.’

परात्पर गुरु डॉक्टरांनी असे सूक्ष्मातील असंख्य गूढ आणि विविध पैलूंचे ज्ञान मला सहजतेने करवून दिले. हे ज्ञान दुर्मिळ असून मला ते त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला मिळाले. याविषयी त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

(समाप्त)

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.