‘प्राईम टी.व्ही. गोवा’वरील मुलाखतीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे प्रतिपादन !
पणजी – गोवा राज्याची ओळख जगात ‘कॅसिनो’ असलेले राज्य’, अशी आहे. उत्तर भारतियांना ‘गोवा हे ख्रिस्ती राज्य आहे’, असे वाटते; परंतु गोव्यात अनेक प्राचीन मंदिरे, सांस्कृतिक व्यवस्था आहे. गोमंतकियांमधील प्रामाणिकता, बंधुभाव लोकांनी अनुभवावा आणि त्यांना गोव्याचा परिचय या माध्यमातून योग्य पद्धतीने होईल. अधिवेशनात आलेले देश-विदेशातील संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या ठिकाणी गोव्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करतात, तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे गोव्यात अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन भरवले जाते, असे प्रतिपादन १० जून २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत केले.
‘प्राईम टी.व्ही. गोवा’चे संचालक श्री. संदीप केरकर यांनी ही मुलाखत घेतली.
मुलाखतीतील महत्त्वाची प्रश्नोत्तरे
१. सर्वव्यापकतेची भावना निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
प्रश्न : केवळ हिंदु धर्मच सर्व गोष्टींचा सारासार विचार करू शकतो ? असे तुम्हाला का वाटते ?
उत्तर : हिंदु धर्म व्यापक विचारसणी असलेला लाखो वर्षांपूर्वीपासूनचा धर्म आहे. याउलट मुसलमान ‘इस्लामचे पालन करणाराच जन्नतमध्ये जाऊ शकतो’, असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे, म. गांधी यांच्या समवेत असलेल्या अलीबंधूंनी म्हटले होते, ‘‘गांधी चांगले आणि सज्जन व्यक्ती आहेत; परंतु त्यांना जन्नत मिळवायची असेल, तर त्यांनी इस्लाम स्वीकारला पाहिजे.’’
‘तुम्ही आमचा धर्म स्वीकारलात, तरच तुम्हाला एखादी गोष्ट मिळू शकते’, असे हिंदु धर्मात कुठेही लिहिलेले नाही. हिंदू मंदिरांप्रमाणे दर्ग्यातही जातात; परंतु मौलाना आणि कॉन्व्हेंट शाळा योगदिन साजरा करण्यास नकार देतात. मुलांच्या आरोग्यासाठी हितावह सूर्यनमस्कार घातल्याने त्यांना लाभच होणार आहे. त्यात भेदभाव करण्यासारखे काही नाही. हा हिंदु धर्म आणि अन्य पंथ यांच्यातील भेद आहे. हिंदु धर्म सर्वव्यापी आहे. हीच भावना संपूर्ण भारतियांमध्ये निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, तरच सर्वजण बंधुभावाने रहातील.
२. गोव्यात ‘इन्क्विझिशन’ संग्रहालय उभे रहावे !
प्रश्न : ‘काश्मीर फाईल्स’ प्रमाणे गोव्यात ‘गोवा फाईल्स’ प्रदर्शन भरवले जात आहे. त्यावर तुमचे मत काय ?
उत्तर : इतिहास हा जसा घडला, तसा लिहिला जातो. गोव्यात पोर्तुगिजांनी केलेल्या ‘इन्क्विझिशन’चा खरा इतिहास ‘गोवा फाईल्स’ प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. विदेशातही ‘इन्क्विझिशन’ संग्रहालये आहेत. भारतातही याची माहिती गोमंतकियांना आणि भारतियांना होऊन त्याचे संग्रहालय उभे रहायला हवे.