पांडुरंग बलकवडे यांचे संशोधन
पुणे – ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांच्या संशोधनामुळे रायगडाच्या इतिहासातील काही अपरिचित गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधक मंडळाच्या कार्यालयात रायगडाशी संबंधित २ रुमालांमध्ये अनुमाने २ सहस्र मोडी कागदपत्रे सापडली आहेत. त्यामध्ये रायगड मुक्त करणारे छत्रपती शाहु महाराजांचे खासगी कारभारी आणि खजिन्याचे कारभारी यशवंतराव पोतनीस यांचा संग्रह आहे. यामध्ये वर्ष १७६६ मध्ये रायगडाच्या रक्षणासाठी छत्रपतींनी नेमलेल्या ५२९ लोकांची नावे, त्यांचे वय, ते चालवत असलेली शस्त्रे आणि त्यांचे वेतन याविषयीची माहिती मिळाली आहे.
इतिहास संशोधक बलकवडे म्हणाले की, रायगडावर महाडीक, मालुसरे, पलांडे, मामुनकर, शेळके, पोतनीस आदी आडनावांचे जवळजवळ ३७ सरदार आपल्या पथकांसह रक्षणाचे दायित्व पार पाडत होते. यशवंत पोतनीस आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विठ्ठल पोतनीस हे अनुमाने ४१ वर्षे रायगडाचे रक्षण अन् कारभार पहात होते. यशवंतराव पोतनीस यांचा शिक्काही या कागदपत्रात आपल्याला उपलब्ध झाला आहे.