बेळगाव, ११ जून – संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अंकली येथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या हिरा आणि मोती या २ अश्वांनी ११ जून या दिवशी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले. कोरोनानंतर पहिल्यांदाच पायी वारी पालखी सोहळा होत असल्यामुळे शितोळे सरकार यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचसमवेत पायीवारी पालखी सोहळ्यात कोणत्याही वारकर्याला कोणताही आजार होऊ नये, अशी प्रार्थनाही ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी माऊलींकडे केली.
अंकली गावातील राजवाड्यातून श्रींच्या अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगर प्रदक्षिणा आणि महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी-कागवाडमार्गे हा सोहळा म्हैसाळकडे मार्गस्थ झाला. मिरज, सांगलीवाडी, तुंग, ईश्वरपूर, सातारा, तसेच विविध गावांमधून हे अश्व २० जून या दिवशी आळंदीत पोचणार आहेत. या अश्वप्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.