जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नूपुर शर्मा यांना पाठिंबा

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे. ‘जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर असे समजा की, आम्हीही बंडखोर आहोत. जय सनातन, जय हिंदुत्व !’, असे ट्वीट साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी सत्य बोलत असल्याने मला अपकीर्त करण्यात आले आहे. साध्वीजींनी ‘ज्ञानवापी’चे नाव न उच्चारता म्हटले की, हे सत्य आहे की, तेथे शिवमंदिर होते आणि राहील. त्याला ‘फव्वारा’ (कारंजे) म्हणणे अयोग्य आहे. हा आमच्यावर, म्हणजे हिंदूंच्या देवता आणि सनातन धर्म यांवर आघात आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुढे म्हणाल्या की,

१. आमचे सत्य सांगा, आम्ही ते स्वीकारू; परंतु जर आम्ही तुमचे (मुसलमानांचे) सत्य सांगत आहोत, तर तुम्हाला त्याचा त्रास का होतो ? याचा अर्थ आहे की, तुमचा इतिहास घाणेरडा आहे.

२. कुणी काही म्हटले, तर त्या व्यक्तीला धमकावण्यात येते. विधर्मींनी (मुसलमानांनी) असे नेहमीच केले आहे.

३. आमच्या देवतांवर चित्रपट बनवून त्यात त्यांच्याविषयी अपशब्द उच्चारले जातात. त्यांचा संपूर्ण इतिहास हा साम्यवाद्यांप्रमाणे आहे.

४. भारतात ‘सनातन (धर्म)’ जिवंत राहील आणि तो जिवंत रहाण्याचे दायित्व आपले आहे अन् आम्ही ते निभावणारच !

५. विधर्मी त्यांची मानसिकता सर्व ठिकाणी रूजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माने स्वत:ला स्थापित केले असून तोच मानवाच्या हिताचा आहे.