उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदूंची भयावह स्थिती !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

१. उत्तराखंडमध्ये रोजगार उपलब्ध न  झाल्याने  ३ सहस्र ६०० गावांमधून लोकांनी पलायन करणे आणि तेथे धर्मांध स्थलांतरित होणे

आमची देवभूमी असलेला उत्तराखंड हा हिंदुस्थानच्या शिरावरील मुकुट आहे. आज तेथे चिंतेची घंटा वाजत आहे. हे कोणत्याही पुस्तकातील नाही, तर स्वत: मी अनुभवले आहे. मी तेथील गावागावांत जाते आणि महिलांना संघटित करते. वर्ष १९९० मध्ये उत्तराखंड राज्य बनल्यापासून लोकांचे स्थलांतर चालू झाले आहे. अर्थात्च तेथून हिंदु समाजाचे लोक पलायन करत आहेत. आपल्याला ठाऊक असेल की, या देवभूमीमध्ये अधिकाधिक लोकसंख्या हिंदूंचीच होती. वर्ष २०११ मध्ये मी तेथे गेले असता मला समजले की, ओडी गढवालच्या क्षेत्रातील १ सहस्र १०० गावे रिकामी अन् ओस पडली आहेत. तेथे एकही व्यक्ती रहात नाही. वर्ष २०१३ मध्ये मी तेथे गेले, तोपर्यंत ३ सहस्र ६०० गावे रिकामी झाली होती. ती गावे रिकामी का झाली ? यावर विचार करावा लागेल. ही गावे रिकामी होत असतांना दुसरी कोणती गोष्ट घडली होती ? तर आमच्या हिंदु बांधवांना तेथे रोजगार उपलब्ध नव्हता. राज्यात काही प्रमाणात विकासाच्या गोष्टी झाल्या असतील; पण आमच्या गावासाठी आणि तरुणांसाठी काही झाले नाही. सगळे जण सपाटीवर गेले आणि तेथे केवळ काही महिला अन् वयस्कर लोक तेवढे राहिले. याचा विचार होणे आवश्यक आहे.

आमचा भूमीपुत्र जो पर्वताच्या कुशीत वाढला आहे, तो तेथे राहू शकत नाही आणि बरेली अन् रामपूर येथून मोठ्या संख्येने मुसलमान लोक त्याठिकाणी वसत आहेत. हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. जेथे आपली मुले राहू शकत नाहीत, अशा कठीण प्रदेशात हे लोक का जात आहेत ? याच्या मागे निश्चितच काहीतरी कारण असणार आहे; परंतु आमच्या कानात चिंतेची घंटा वाजत नाही आणि आमच्या कानाला आता काही ऐकू येत नाही.

२. उत्तराखंडमध्ये एक मठाधिपती असल्याचे भासवून  धर्मांध भूमाफियाने हिंदूंची शेकडो एकर भूमी खरेदी करणे

सुश्री नीरा सिंह

७-८ वर्षांपूर्वीचा माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव सांगते. माझे घर भीमतालमध्ये आहे. एके दिवशी काही खरेदीसाठी मी बाजारात गेले होते. तेथे भगवे वस्त्र घातलेली एक व्यक्ती गाडीत बसली होती. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला आणि मी तिकडे गेले. मी तेथील रहिवासी असल्याने त्यांच्यासमवेत असलेल्या व्यक्तींना मी चांगली ओळखत होते. या साधु व्यक्तीसमवेत हे ‘भूमाफिया’चे लोक कसे काय ? याचे मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, ‘‘ही व्यक्ती कोण आहे ?’’ त्यांनी सांगितले, ‘‘प्रयागमध्ये एक मठ आहे. त्याचे ते प्रमुख आहेत.’’ मी स्वतः प्रयागची आहे. ईश्वराच्या कृपेने या क्षेत्रातील लोकांना मी ओळखते. मी त्यांना विचारले, ‘‘हे कोणत्या मठातून आले आहेत? मला नाव सांगा, माझीही त्यांच्याशी भेट घडवून द्या.’’ त्यानंतर जेवढे दिवस मी तेथे होते, तेवढे दिवस ती व्यक्ती मला परत कधीही दिसली नाही. नंतर त्याच्याविषयी मी माहिती मिळवली. तेव्हा मला धक्का बसला. भगवे वस्त्रामध्ये असलेले ते कुणी साधूसंत नव्हते, तर एक धर्मांध व्यक्ती होती की, जी बनावट साधू बनून दलालांसमवेत आमच्या उत्तराखंडमधील गावेच्या गावे खरेदी करायला आली होती. मला हे सांगतांना वाईट वाटते की, माझ्या सर्व हिंदु बांधवांना सर्व ठाऊक होते.

नाकुछताल म्हणून एक ठिकाण आहे. तेथे कर्नाटकातील ब्राह्मणांची ३-४ गावे आहेत. धर्मांध भूमाफियांची वक्रदृष्टी विशेष करून त्याच ३-४ गावांवर होती. आमच्या कर्नाटकातील ब्राह्मण बांधवांनी कधीही ती जागा विकलीच नसती; परंतु त्यांनी फसवणूक करून ती गावे खरेदी केली. कुणी असे अकारण खरेदी करेल का? हा चिंतेचा विषय आहे.

३. कैचीधाममध्ये नीमकरोली बाबांच्या भंडाऱ्याच्या ठिकाणी काही धर्मांध तरुणांनी हिंदूंना न्याहाळणे आणि त्यामागील कारण न समजणे

कैचीधाममध्ये नीमकरोली बाबांचा एक पुष्कळ मोठा भंडारा होतो. तेथे दीड ते दोन लाखांहून अधिक हिंदू भंडाऱ्याला येतात. मीही प्रतिवर्षी तेथे जाते. तेथे मी ४-५ तिरक्या टोपीवाल्या धर्मांध तरुणांना भंडाऱ्याच्या आजूबाजूला केवळ हिंदूंना वरपासून खालपर्यंत न्याहाळत जातांना पाहिले. त्यांचे तेथे येण्याचे काय प्रयोजन असावे, हे माझ्या लक्षात आले नाही. मी त्यावर पुष्कळ विचार केल्यावर मला काळजी वाटू लागली. ते आम्हाला हुसकावून तर लावणार नाहीत? ते आमच्या हिंदु बांधवांना विस्थापित तर करणार नाहीत ? ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीत ना ? आमच्या स्थानी येऊन ते आम्हाला आव्हान देत आहेत. त्या वेळी माझा हिंदु जनजागृती समितीशी काहीच परिचय नव्हता. गोव्याच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहिल्यावर मला जे बळ मिळाले आहे, ते मला संकल्पित आहे, असे वाटते. जे आमच्या काश्मीरमध्ये झाले, जे आसाम आणि त्रिपुरा येथे होत आहे, ते आमच्या उत्तराखंडाच्या ठिकाणी होऊ देणार नाही.

४. हिंदूंच्या गावांमध्ये धर्मांधांची १-२ कुटुंबे रहायला आल्यावर तेथील हिंदूंमध्ये भीतीचे सावट पसरणे

गढवाल क्षेत्रातील जी ३ सहस्र ६०० गावे खाली झाली आहेत, त्यातील सर्वाधिक गावे धर्मांध भूमाफिया खरेदी करत आहेत. अल्मोडा गावाजवळ एका फार वयस्कर व्यक्तीशी माझा परिचय झाला होता. माझ्या महिला स्वयंसेवक पहाडी भागातून १०-२० किलोमीटर अंतर चालत येतात. हिंदु समाजातील महिलांसारखी शक्ती दुसऱ्या कोणत्याही समाजातील महिलांकडे नसेल. त्या रात्री-अपरात्री हसत, खेळत जातात आणि सर्व कामे करतात. त्यांना कशाचेही भय वाटत नाही; परंतु त्या दिवशी एका वयस्कर व्यक्तीने मला सांगितले, ‘‘माते, आता आम्हाला भीती वाटू लागली आहे.’’ मी म्हटले, ‘‘काय झाले ? आता कशाची भीती वाटत आहे ?’’ ते म्हणाले, ‘‘येथे धर्मांधांनी वास्तव्य करणे चालू झाले आहे.’’ ज्यांचे घर, भूमी आणि समाज आहे अन् जो बहुसंख्येने तेथे रहात आहे, तेही धर्मांधांची १-२ कुटुंबे आल्यावर एवढे भयभीत होत आहेत. त्यामुळे उद्या हा विषय चिंतेचा होणारच ना ?

५. सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करत असल्याने अशा असाहाय्य हिंदूंना हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी साहाय्य करणे आवश्यक !

उत्तराखंडमधील लोक आणि महिला यांना काही रोजगाराचे साधन मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. यात मी ईश्वराच्या कृपेने पुष्कळ काही करू शकत आहे; परंतु आताही ध्येय फार दूरवर आहे. तेथे दूरवर पर्वतीय क्षेत्र असल्याने कुणी पोचू शकत नाही; पण ख्रिस्ती पोचतात. ते साहाय्याच्या नावाखाली लोकांना विकत घेतात आणि त्यांचे धर्मांतर करतात. हे थांबवण्यासाठी आपण या लोकांना साहाय्य केले पाहिजे. ते अगदी असाहाय्य असल्याचे अनुभवत आहेत. आपल्याला त्यांच्याकडे अंतःकरणापासून जाऊन त्यांची सेवा करावी लागेल. त्यांना नैतिक बळ द्यावे लागेल. त्यांच्यावर दबाव आणावा लागेल की, काहीही करून गाव सोडून जाऊ नका, गाव ओस पडू देऊ नका. त्यांना नैतिक पाठिंबा द्यावा लागेल. माझी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी या असाहाय्य हिंदूंना साहाय्य करणे अत्यंत आवश्यक आहे.

६. ख्रिस्त्यांनी हिंदूंना साहाय्य करून त्यांचे हळूवारपणे धर्मांतर करणे

तेथे धर्मांतर होत असतांना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि ते रोखण्याचा प्रयत्न करत आहे; पण त्यात मला फारसे यश मिळाले नाही, असे मला वाटते. आज त्यांचे लक्ष्य कुमाऊंजातीच्या व्यक्तींपेक्षा अधिकतर नेपाळी लोक झाले आहेत; कारण की जी ३ सहस्र ६०० गावे ओस पडली आहेत, त्यातील काही लोकांनी नेपाळी कामगारांना त्यांच्या जागेची सूची दिली आहे. नेपाळ एक हिंदु राष्ट्र असून त्याला आमच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. त्या नेपाळींचे ख्रिस्ती धर्मांतर करत आहेत. ही गोष्ट आपल्यासाठी फार धोकादायक आहे. आमच्या सीमा असुरक्षित होतील आणि हिंदु धर्माचे हे गाव वाचू शकणार नाही. त्याला ‘ख्रिस्ती गाव’ म्हटले जाईल. ज्याप्रमाणे त्यांनी अफ्रिकेचे संपूर्ण धर्मांतर करून त्यांच्या कह्यात घेतले. त्याप्रमाणे ते आमच्या देशाला हळूहळू कह्यात घेतील. त्यांचे धर्मांतर अतिशय नियोजनपूर्वक चालू असते. ते हिंदूंना ‘तुम्ही धर्मांतर करा’, असे म्हणत नाहीत. ते रोजगार देतात. ज्या प्रकारचा रोजगार असतो, त्याप्रमाणे त्यांची सिद्धता करवून घेतात. त्यांच्या मुलांना वसतीगृहात घालतात. त्यांच्या मुलांना ते संपूर्ण ख्रिस्ती पद्धतीचे शिक्षण देतात. त्यानुसार ते त्यांना मोठे करतात; परंतु ते असे म्हणत नाहीत की, तुमचे धर्मांतर करत आहोत. त्यामुळे आईवडिलांना त्यांचा मुलगा चांगले शिकतांना दिसतो. त्यांचे पैसे आईवडिलांकडून काम करवून वसूल करतात. अशा प्रकारे ते धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात. आता ते चर्च बनवत नाहीत, तर ख्रिस्त्यांच्या घरात २५-२५ किंवा ५०-५० लोकांची बैठक घेतात. अशा प्रकारे ते हिंदूंना ख्रिस्तीमय करतात.

७. भगवान शिव आणि ॠषिमुनी यांची तपोभूमी असलेल्या अरुणाचल प्रदेशाला ख्रिस्त्यांचा वेढा पडणे

ईश्वराच्या कृपेने माझा अरुणाचलमध्येही पुष्कळ प्रवास वाढला आहे. अरुणाचल ही आपल्या शिवशंकराची देवभूमी आहे. तेथे वीरो नावाचे एक स्थान आहे. जेथून २५ फुटांवर आपले स्वयंभू महादेव आहेत. जेथे परशुरामाने त्यांची सर्व पापे धुतली होती, ते परशुराम कुंड आहे. त्यांच्याकडून जी काही चूक झाली, त्यासाठी त्यांनी क्षमायाचना केली होती. आज कुठेही कोणत्याही कोपऱ्यात तेथे शिवलिंग मिळतात आणि हे माझे फार मोठे सौभाग्य आहे की, माझ्या स्वतःच्या मुलाच्या घराचे नूतनीकरण करतांना एक अर्धनारीश्वर शिवलिंग प्रकट झाले. तेथे आपले हिंदु बंधू नाहीत, असे काही नाही; पण त्यांना आपण हिंदूंच्या वर्गीकरणात धरू शकत नाही. तेथे जे मूळचे आदिवासी लोक आहेत, त्यांच्याकडून सूर्य आणि चंद्र यांची पूजा केली जाते. ख्रिस्त्यांनी त्यांना अत्यंत वाईट प्रकारे घेरले आहे. तेथे बांगलादेशातून आलेली चकमा जनजाती आहे, ज्यांचे बौद्धांनी धर्मांतर केले आहे. तेथे ज्या हिंदु जमाती रहात आहेत, त्यांच्यावरही त्याच प्रकारे अत्याचार झाले आहेत. अरुणाचल ज्याला तिबेट म्हणून चीन आपलाच भाग म्हणत आहे, ती आपल्या शिवाची आणि आपल्या ॠषिमुनींची तपोभूमी आहे.

– सुश्री नीरा सिंह, प्रयाग, उत्तरप्रदेश.

काश्मीरप्रमाणे देवभूमी उत्तराखंडमधून हिंदूंना धर्मांधांमुळे पलायन करावे लागणे, ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा !