बलुचिस्तानमध्ये २३ वर्षांत ८ सहस्र बलुची लोकांचे अपहरण !

अपहरण झालेले बलुचिस्तानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – लुचिस्तानमध्ये गेल्या २३ वर्षांत ५ ते ८ सहस्र लोक बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी गेली अनेक दशके पाकच्या विरोधात संघर्ष करत आहे. त्यामुळेच पाक सैन्याकडून बलुची लोकांवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. बलूचचे विद्यार्थी नेते जाकीर माजिद बलोच बेपत्ता झाल्याच्या घटनेला ८ जून या दिवशी १४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त बलुचिस्तानमधील क्वेटा शहरातील प्रेस क्लबसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचे नेतृत्व ‘व्हाइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स’ (व्हीबीएमपी) या संघटनेने केले.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने विद्यमान शाहबाज सरकारपासून माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यापर्यंत सर्व माजी अधिकार्‍यांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नेमके किती लोक बेपत्ता आहेत याचा शोध घेण्यात यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

१. बेपत्ता झालेल्यांमध्ये बलुचिस्तानसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. बलूच राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यांच्या नागरी हक्कांसाठी चीन-पाकिस्तानच्या आर्थिक प्रकल्पाला विरोधही करत आहेत.

२. बलूच प्रांतातील अपहरणांचा तपास करण्यासाठी पाकिस्तानला पोचलेले नॉर्वेचे मानवी हक्क कार्यकर्ते एहसान अर्जेमंडी यांनाही वाईट वागणूक देण्यात आली होती. अर्जेमंडी यांना अवैधरित्या कह्यात घेऊन क्रूर वागणूक देण्यात आली होती. याविषयी अर्जेमंडी म्हणाले, ‘‘मी ३१ जुलै २००९ मध्ये बलूच येथे पोचलो. त्यानंतर मला प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे मला तपास पूर्ण करता आला नाही.’’ ६ ऑगस्टला ते मांड येथे कराचीला जाणार्‍या बसमध्ये बसले होते. ७ ऑगस्टच्या सकाळी बलुचिस्तान आणि सिंध यांच्यामध्ये पाकिस्तान सुरक्षा दलांनी त्यांना बसमधून बाहेर फेकले.

संपादकीय भूमिका

पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्‍चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !