ईश्वरकृपेने मला (सौ. आशा कागवाड यांना) बेळगावमध्ये सनातनच्या वतीने धर्मकार्यासाठी अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा मिळाली आहे. ही सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती मी त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.
७.६.२०२२ या दिवशीच्या अंकात यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहू. (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/585953.html
४. समाजातून अर्पण मिळवण्याची सेवा करतांना साधिका आणि अर्पणदाते यांना परात्पर गुरुदेवांनीच सूक्ष्मातून सिद्ध करवून घेतले असल्याची साधिकेला येत असलेली प्रचीती !
४ अ. साधनेत येण्यापूर्वी लोकांशी बोलण्याशी लाज वाटणे, इतरांकडून काही मागणे न जमणे; परंतु साधनेत आल्यावर गुरुकृपेने धर्मकार्यासाठी अर्पण मिळवण्याची सेवा सहजतेने करता येणे : ‘पूर्वी मला इतरांशी बोलायची लाज वाटायची. ‘माझ्याकडून बोलतांना काही चुकले, तर लोक काय म्हणतील ?’ असे प्रतिमा जपण्याचे विचार माझ्या मनात येत असत. त्यामुळे मला कुणाकडून काही मागणे मुळीच जमत नसे. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मकार्यासाठी अर्पण मिळवण्याची सेवा माझ्याकडून सूक्ष्मातून सहजतेने करवून घेतली आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने आताही मी ती सेवा करत आहे, तरीही एखाद्या वेळी ‘अर्पणासाठी इतक्या मोठ्या उद्योगपतींकडे कसे जायचे ? अर्पण किंवा विज्ञापने कशी घ्यायची ?’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येतात. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करते, ‘हे गुरुदेवा, मला काही जमत नाही. तुम्हीच काय, ते बघून घ्या.’ तेव्हा ‘गुरुदेवच माझ्या माध्यमातून पुष्कळ सहजतेने अर्पणाचा विषय उद्योगपतींना सांगतात’, याची मला जाणीव होते आणि त्या वेळी विज्ञापन अन् अर्पण लगेचच मिळते.
४ आ. ‘परात्पर गुरुदेवांनी समाजातील अर्पणदात्यांना आधीच सिद्ध केले आहे’, असे जाणवणे आणि त्यामुळे धर्मकार्यासाठी हव्या असलेल्या वस्तू अर्पणात मिळणे : अर्पण मिळवण्याची सेवा करतांना आपल्याला आवश्यक ती विज्ञापने, अर्पण, धर्मकार्यासाठी हव्या असलेल्या वस्तू अर्पण स्वरूपात पटकन मिळतात. त्यासाठी ‘गुरुदेवांनी समाजातील लोक सिद्ध करून ठेवले आहेत आणि मला तेथे केवळ जायचे आहे, इतकेच !’, असा विचार गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात येतो. ‘मला समाजातून कधीही कोणतीही गोष्ट अर्पणात मिळाली नाही’, असे कधीच होत नाही. विशेष अनुभूती म्हणजे गुरुदेवांनी अर्पणदात्यांची वर्गवारी करून दिली आहे. गुरुकृपेने मी केवळ विशिष्ट वर्गातील योग्य लोकांकडेच संपर्कासाठी जाते आणि माझी सेवा पटकन होते. याविषयी मला मागील ७ वर्षांपासून अनुभूती येत आहेत.
४ इ. साधिकेच्या यजमानांनी साधिकेची सेवा चांगली होण्यासाठी देवाला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे अन् त्यानंतर तिला सेवा चांगली झाल्याची अनुभूती येणे : मी प्रतिदिन अर्पण मिळवण्याची सेवा आणि अध्यात्मप्रसार यांसाठी बाहेर जाते. मी बाहेर जाण्यापूर्वी माझे यजमान (श्री. दिलीप कागवाड) घरी देवपूजा आणि आरती करतात. ते देवाला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करतात, ‘ही (माझी पत्नी) आज अर्पण घेण्यासाठी ज्यांच्याकडे जाणार आहे, त्यांची तिच्याशी भेट होऊ दे आणि तुम्हाला अपेक्षित अशी तिची सेवा होऊ दे.’ ते मला देवाजवळील फूल न विसरता देतात. त्यानंतर मला माझ्याकडून चांगली सेवा झाल्याची अनुभूती येते.
४ ई. अर्पणदात्यांनी साधकांचे कौतुक करणे; परंतु ‘हे कौतुक म्हणजे, अर्पणदात्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेले कृतज्ञतापुष्प आहे’, असे जाणवणे : काही वेळा मी जिज्ञासूंना भ्रमणभाष केल्यावर ते मला म्हणतात, ‘‘तुम्ही आम्हाला धर्मसेवेची संधी देता’, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’’ काही जण मला म्हणतात, ‘‘तुम्ही महिला असूनही इतकी सेवा करता ! त्या तुलनेत आम्ही काहीच करत नाही. तुम्ही हे सर्व समाज, धर्म आणि राष्ट्र यांसाठी करता. तुमचे कार्य पुष्कळ मोठे आणि चांगले आहे.’’ प्रत्यक्षात मी या सेवेसाठी तसे काहीच केलेले नसते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अर्पणदात्यांना बुद्धी आणि प्रेरणा दिलेली असते. मी केवळ त्यांना संपर्क केलेला असतो; म्हणून ‘अर्पणदात्यांनी केलेले कौतुक, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी त्यांनी वाहिलेले कृतज्ञतापुष्प आहे’, असे मला वाटते.
४ उ. अर्पण मिळवण्याची सेवा करतांना लोकांकडून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळणे : मला अर्पण मिळवण्याची सेवा करतांना समाजातील लोकांकडून पुष्कळ शिकायला मिळते. मला त्यांच्याकडून ‘आपलेपणा, प्रामाणिकपणा, नियोजन, प्रत्येक गोष्ट न चुकता वेळेवर करणे, साधेपणा’ इत्यादी गुण शिकता आले.
४ ऊ. काही अर्पणदात्यांची साधना आणि भाव चांगला असल्याचे साधिकेला जाणवणे : बेळगाव येथे अर्पणदातेही पुष्कळ चांगले आहेत. ते आम्हाला आवर्जून सांगतात, ‘‘तुम्ही आमच्याकडे इतक्या उन्हामध्ये आणि पावसामध्ये कशाला येता ? तुम्ही त्रास घेऊन येऊ नका. तुम्ही आम्हाला केवळ भ्रमणभाष केला, तरी आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे तुमच्याकडे धनादेश (चेक) पाठवण्याची व्यवस्था करतो. तुमचा वेळ अमूल्य आहे. आपण परिचयाचे झालो आहोत. तुमचा वेळ तुम्ही दुसऱ्या संपर्कासाठी वापरा.’’ तेव्हा ‘माझ्यापेक्षा समाजातील लोकांचीच साधना आणि भाव अधिक आहे’, असे मला अनुभवयास मिळते.
४ ए. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मकार्यासाठी समाजातील लोकांना सिद्ध केले आहे’, हे लक्षात आल्यावर साधिकेला स्वतःतील अहंची जाणीव होणे : गुरुदेवांनी आम्हा साधकांसाठी समाजातील लोकांना सिद्ध केले आहे. पूर्वी मला वाटायचे, ‘मी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करते, म्हणजे मला पुष्कळ येते. मी व्यवस्थित विषय मांडते किंवा चांगले बोलते. त्यामुळे समाजातील लोक विज्ञापने आणि अर्पण देतात.’ याविषयी मला पुष्कळ अहं होता; पण मला गुरुदेवांच्या कृपेने समजले, ‘समाजातील लोकांची साधना कृतीच्या स्तरावरील आहे आणि मी पुष्कळ न्यून पडते.’
५. धर्मकार्यासाठी अर्पण मिळवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
५ अ. उपाहारगृहाच्या मालकांनी साधिकेला तिच्या आवाजावरून ओळखणे आणि ‘लोक आपल्याला आपल्या आवाजावरून ओळखतील !’, या गुरुदेवांनी पुष्कळ वर्षांपूर्वी सांगितलेल्या वाक्याची प्रचीती येणे : ‘वर्ष २०१७ मध्ये मी एका उपाहारगृहाच्या मालकांना ‘सनातन पंचांग’ देण्यासाठी गेले होते. तेथील एका व्यक्तीला मी विचारले, ‘‘मालक कुठे आहेत ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मीच मालक आहे. तुम्ही सनातनच्या आहात ना ?’’ मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही मला कसे काय ओळखले ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमच्या आवाजावरून मी ओळखले.’’ तेव्हा ‘लोक आपल्याला आपल्या आवाजावरून ओळखतील !’, या गुरुदेवांनी फार वर्षांपूर्वी सांगितलेल्या वाक्याची मला प्रचीती आली.
५ आ. ८ – ९ वर्षे न भेटताही उपाहारगृहाच्या मालकांनी प्रतिवर्षी अर्पण म्हणून अल्पाहार देणे आणि ‘संपर्क केल्यामुळे ते अर्पण देतात’, हा साधिकेचा अहं न्यून होणे : त्या वेळी मालक मला म्हणाले, ‘‘तुम्ही वेळेवर आलात. मला माझ्या मामांनी सनातनविषयी सर्व सांगितले आहे. ‘या वर्षीचे ‘सनातन पंचांग’ मला मिळेल कि नाही ?’, असे मला वाटत होते.’’ त्यांनी हे सांगितल्यावर ‘गुरुदेव एखाद्या जिवाची कशी काळजी घेतात ?’, हे मला समजले आणि पुष्कळ आनंद झाला. माझा अहं न्यून झाला आणि मी कृतज्ञता व्यक्त केली. तोपर्यंत मला वाटत होते, ‘मी संपर्क करते; म्हणून ते अर्पण देतात’; परंतु ८ – ९ वर्षे आम्ही एकमेकांना न भेटताही ते प्रतिवर्षी कार्यक्रमासाठी अर्पण म्हणून अल्पाहार न चुकता देतात.’ हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच होते.
५ इ. उपाहारगृहाच्या मालकांनी सनातनचे साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् धर्मकार्य यांच्याप्रती भाव ठेवून अन्नदान करणे
५ इ १. उपाहारगृहाच्या मालकांनी सनातनला पुष्कळ प्रेमाने आणि आनंदाने अन्नदान करणे : बेळगाव येथील एका उपाहारगृहाच्या मालकांची परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आणि भाव आहे. त्यांचा भाव त्यांच्या कृतीतून जाणवतो, तसेच त्यांचा सनातनच्या साधकांविषयीही पुष्कळ भाव आहे. ते म्हणतात, ‘‘सनातनच्या साधकांना अर्पण देतांना मला पुष्कळ आनंद होतो. साधक इतकी सेवा करतात, इतके कष्ट घेतात, तर त्यांना सर्व चांगलेच खाद्यपदार्थ द्यायला हवेत.’’ ते अर्पण देण्याच्या सर्व कृती पुष्कळ प्रेमाने आणि आनंदाने करतात.
५ इ २. उपाहारगृहाच्या मालकांनी साधकांप्रतीच्या प्रेमभावामुळे हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या वेळी जेवण, वाढपी आणि भांडी धुणारे कर्मचारीही पाठवणे : उपाहारगृहाचे मालक नियमितपणे हिंदु-राष्ट्र जागृती सभेसाठी सेवा करणाऱ्या साधकांसाठी जेवण अर्पण करतात. जेवण देतांना ‘कुणाला अल्प पडू नये’, असा विचार करून ते अधिक प्रमाणात अन् चांगल्या प्रतीचे जेवण द्यायचे. हिंदु-राष्ट्र जागृती सभेला त्यांनी वाढपी आणि जेवण करण्यासाठी ताट, वाट्या, चमचे, पेले इत्यादी साहित्य पाठवले होते. जेवल्यानंतर साधकांचा भांडी धुण्यामध्ये वेळ जाऊ नये; म्हणून त्यांनी भांडी धुण्यासाठी कर्मचारीही पाठवले होते.
५ इ ३. उपाहारगृहाच्या मालकांनी गोवा येथील दुसऱ्या राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाच्या वेळी जेवण बनवण्यासाठी त्यांचे आचारी पाठवणे : उपाहारगृहाच्या मालकांनी गोवा येथील दुसऱ्या राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाच्या वेळी जेवण बनवण्यासाठी त्यांचे आचारी गोवा येथे पाठवले होते. त्यांनी सर्वांना गव्हाची खीर बनवून दिली होती. कोणताही पदार्थ कितीही जणांसाठी बनवतांना त्यांना कंटाळा आला नाही किंवा कष्ट वाटले नाहीत.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘समाजातून धर्मकार्यासाठी अर्पण, विज्ञापने मिळवणे किंवा साधकांसाठी जेवण मिळवणे’, हे गुरुदेवांच्या कृपेविना शक्यच नाही’, अशी मला सतत जाणीव होते. सध्याच्या घोर कलियुगातही धर्मकार्यासाठी अर्पण देणारे अतिशय चांगले अर्पणदाते समाजात आहेत. गुरुदेवांनी माझी त्यांच्याशी भेट घालून दिली आहे. ‘हे गुरुराया, माझी पात्रता आणि क्षमता नसतांनाही तुम्हीच मला साधनेत घेऊन आलात अन् माझे कित्येक जन्मांचे प्रारब्ध फेडून घेतले. तुम्हीच माझ्याकडून प्रतिदिन सेवा करवून घेत आहात’, याबद्दल मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे आणि ‘कृतज्ञता’ हा शब्दही अल्प आहे.
‘हे गुरुराया, ‘माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण माझ्याकडून साधना करवून घ्यावी’, हीच आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना करते.
(समाप्त)
– सौ. आशा दिलीप कागवाड, बेळगाव (१२.४.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |