भगवंतावर श्रद्धा ठेवून अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना बेळगाव येथील सौ. आशा दिलीप कागवाड यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

ईश्वरकृपेने मला बेळगावमध्ये धर्मकार्यासाठी अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा मिळाली आहे. मी जेव्हा अर्पण मिळवण्यासाठी समाजात जाते, तेव्हा अनेक लोकांच्या गाठीभेटी होत असतात. तेव्हा ‘भगवंताने अगोदरच सेवेचे नियोजन करून अर्पणदाते सिद्ध करून ठेवलेले असतात. भगवंत मला केवळ माध्यम बनवून माझ्याकडून सेवा करवून घेऊन आनंद देत आहेत’, याची मला सतत अनुभूती येते. ‘भगवंत समाजातील विविध घटकांकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करवून घेत आहे’, असे मला वाटते. सेवा करतांना भगवंताच्या कृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती मी त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.

(भाग १)

१. कार्यक्रमांसाठी अन्नदान मिळवण्याची सेवा करतांना आलेले अनुभव अन् अनुभूती

१ अ. उपाहारगृहांच्या मालकांचा परात्पर गुरुदेवांच्या कार्याविषयी भाव असणे आणि त्यांनी स्वतःहून सेवा करण्याची इच्छा व्यक्त करणे : बेळगावमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा, साधकांसाठी कार्यशाळा, प्रांतीय अधिवेशन, गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या वेळी सेवा करणाऱ्या साधकांच्या भोजनव्यवस्थेची सेवा माझ्याकडे असते. तेव्हा माझा बऱ्याच उपाहारगृहांच्या मालकांशी संपर्क होतो. काही मालकांचा परात्पर गुरुदेवांच्या कार्याविषयी पुष्कळ भाव आहे, उदा. मी एका मालकाला भ्रमणभाष केल्यावर ते तत्परतेने मला म्हणतात, ‘‘ताई, आम्ही कोणती सेवा करू शकतो ?’, ते तुम्ही आम्हाला सांगा.’’

१ आ. उपाहारगृहांच्या मालकांनी अन्नदानासाठी स्वतः साहाय्य करणे किंवा इतर अर्पणदात्यांचे संपर्क क्रमांक देणे : बेळगावमध्ये गुरुदेवांच्या कृपेने ३० ते ३५ उपाहारगृहांच्या मालकांशी आमचे पुष्कळ चांगले संबंध आहेत. आम्ही अकस्मात् कधीही अन्नदानाविषयी विचारले, तरी ते पटकन साहाय्य करतात. कधी काही जण स्वत: अर्पण करण्यासह इतर अर्पणदात्यांचा संपर्क क्रमांक देतात आणि सांगतात, ‘‘तुम्ही त्यांच्याकडे जा. ते चांगले लोक आहेत. ते तुम्हाला नक्की साहाय्य करतील.’’ काही वेळा ते स्वतः भ्रमणभाष करून इतरांना सांगतात, ‘‘तुमच्याकडे अर्पणासाठी सनातनवाले येतील. त्यांना साहाय्य करा; कारण ते राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत.’’ यावरून भगवंत समाजातील लोकांकडूनही सेवा आणि त्याग करवून घेत आहे, तसेच आम्हा साधकांच्या सेवेची काळजी घेत आहे’, असे मला वाटते.

१ इ. आवश्यक तेवढ्याच खाद्यपदार्थांची अर्पण म्हणून मागणी केल्यावरही उपाहारगृहाच्या मालकांनी स्वतःहून अधिकचे पदार्थ देणे : एका उपाहारगृहाच्या मालकांनी मला स्वतःहून विचारले, ‘‘मी आपल्या कार्यासाठी अर्पण म्हणून काय देऊ ?’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली. ‘ते साधकच आहेत’, असे मला वाटले. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘चपाती, भाजी, भात, आमटी, इतकेच पदार्थ द्या.’’ तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘कोणता गोड पदार्थ देऊ ?’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘गोड पदार्थ नको.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘इतके साधे आणि अल्प पदार्थ कसे द्यायचे ?’’ त्यामुळे त्यांनी स्वतःहून मी सांगितलेल्या पदार्थांच्या समवेत लोणचे, पापड, चटणी, कोशिंबीर, असे अधिकचे पदार्थ दिले. अशा प्रकारे इतर मालकही न मागता वेगवेगळे पदार्थ देतात.

१ ई. ‘साधकांना अन्न अल्प पडू नये’, असा विचार करून उपाहारगृहाच्या मालकांनी सांगितलेल्या संख्येपेक्षा अधिक जणांचे जेवण देणे : काही उपाहारगृहाच्या मालकांना मी भ्रमणभाष केल्यावर ते विचारतात, ‘‘किती साधकांसाठी जेवण हवे आहे ?’’ मी त्यांना साधकांची संख्या सांगते; परंतु मालकांचा प्रेमभाव म्हणून ते आम्ही सांगितलेल्या संख्येपेक्षा ५ ते १० जणांचे अधिक अन्न देतात. अर्पण करणारे मालक म्हणतात, ‘‘तुम्हाला न्यून पडायला नको आणि न्यून पडले, तर आम्हाला सांगा.’’ यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रेमळ अर्पणदात्यांना अगोदरच सिद्ध केले आहे’, याचे आश्चर्य वाटून माझ्याकडून कृतज्ञताही व्यक्त होते.

१ उ. २ वर्षांच्या दळणवळण बंदीनंतर उपाहारगृहाच्या मालकांना संपर्क केल्यावर त्यांना आनंद होऊन त्यांनी कार्यशाळेसाठी जेवण अर्पण करणे : १२ आणि १३ मार्च २०२२ या दिवशी बेळगावमध्ये कार्यशाळा होती. त्या पूर्वी कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे अनुमाने २ वर्षे आपले धर्मप्रसाराचे कार्य ‘ऑनलाईन’ चालू होते. एका उपाहारगृहाच्या मालकांना मी कार्यशाळेसाठी जेवण अर्पण करण्यासाठी संपर्क केला होता. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि ते मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही आम्हाला विसरला नाही ना ? मी काय सेवा करू ?’’ त्यांनी आम्हाला आवश्यक तेवढे जेवण अर्पण केले.

सौ. आशा कागवाड

२. अर्पण मिळवण्याची सेवा करतांना आलेले अनुभव आणि अनुभूती

बेळगावमध्ये पुष्कळ चांगले अर्पणदाते आहेत. आम्ही बेळगाव येथील औद्योगिक वसाहतीत (इंडस्ट्रियल एरियामध्ये) अर्पण घेण्यासाठी जातो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पुष्कळ अनुभूती येतात.

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सुचवलेल्या अर्पणदात्यांकडे गेल्यावर त्वरित अर्पण मिळणे : मला ज्या दिवशी अर्पणदात्यांकडे जायचे असते, त्या दिवशी माझे चिंतन चालू होते. ‘आज कुणाकडे जायचे ?’ त्या वेळी गुरुदेव सूक्ष्मातून मला अर्पणदात्यांची नावे सुचवतात. आम्ही नेमके त्या अर्पणदात्यांकडे जातो आणि आम्हाला पटकन अर्पण मिळते.

२ आ. अर्पणदाते प्रत्यक्षात न भेटताही अर्पण मिळणे : बऱ्याच वेळा आम्ही अर्पणदात्यांकडे गेल्यावर ते आम्हाला भेटत नाहीत; पण त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये सांगून ठेवलेले असते, ‘‘सनातनवाले आले की, त्यांचा धनादेश किंवा जे काही अर्पण असेल, ते त्यांना द्या.’’

२ इ. सदिच्छा भेट म्हणून अर्पणदात्यांना भेटल्यावर त्यांना आनंद होणे आणि त्यांनी त्यांच्या अनुभूती सांगणे : काही वेळा आम्ही सदिच्छा भेट म्हणून मुद्दाम वेळ काढून अर्पणदात्यांना भेटायला जातो. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते आम्हाला विचारतात, ‘‘काय विशेष ? कोणत्या कारणासाठी अर्पण हवे आहे ?’’ त्या वेळी ‘आम्ही तुम्हाला केवळ भेटायला आलो आहोत’, असे सांगतो. तेव्हा अर्पण दिल्यामुळे त्यांना आलेले चांगले अनुभव ते आम्हाला आनंदाने सांगतात.

२ ई. कोरोना महामारीच्या काळातही अर्पणदात्यांनी अर्पण देणे : कोरोनाच्या काळातही आम्ही अर्पणदात्यांना ‘धर्मकार्यासाठी सनातनला अर्पण देणे, ही साधना आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी आढेवेढे न घेता अर्पण दिले. एवढेच नव्हे, तर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला धर्मसेवेची संधी दिलीत, त्यासाठी धन्यवाद !’’

२ उ. आस्थापनाच्या मालकांनी पहिल्या भेटीत अर्पण देणे आणि गुरुकृपेने मालकांनी न मागता प्रतिवर्षी अर्पण देण्याविषयीचे नियोजन करणे : वर्ष २००५ मध्ये मी बेळगावमधील एका आस्थापनाच्या मालकांना भेटले होते. त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि त्यांनी त्वरित अर्पण दिले. दुसऱ्या वर्षी आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर अकस्मात् ते त्यांच्या वैयक्तिक साहाय्यकाला (पी.ए.ला) म्हणाले, ‘‘यांना प्रत्येक वर्षी आपणाकडून अर्पण द्यायचे आहे. ते तुम्ही देत जा.’’ त्यांचे वैयक्तिक साहाय्यक अतिशय सात्त्विक आणि धार्मिक आहेत. त्यानंतर प्रतिवर्षी तेच आम्हाला अर्पणाचा धनादेश देतात. आम्ही वाढीव रक्कम मागितली, तर तीसुद्धा ते पटकन देतात. तेव्हा ‘गुरुदेवांनी आम्हाला धर्मसेवेसाठी पुष्कळ सुविधा निर्माण करून दिल्या आहेत’, असे मला वाटते.

३. सात्त्विक उत्पादनांचे वितरण करण्याची सेवा करतांना आलेले अनुभव आणि अनुभूती

३ अ. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची मागणी स्वतःहून करणे : आम्ही (मी आणि एक सहसाधिका) समाजामध्ये अर्पण मिळवण्याच्या सेवेला जातो. अर्पण मिळवण्याच्या सेवेच्या कालावधीत एखाद्या कारखान्यात जाण्यापूर्वी आम्ही कापूर आणि अत्तर यांचे उपाय करतो. तेथील कार्यालयातील कर्मचारी आम्हाला पाहून म्हणतात, ‘‘सनातनच्या ताई आल्या आहेत.’’ याविषयी आधी आम्हाला आश्चर्य वाटायचे, ‘यांनी कसे ओळखले ?’ ते आम्हाला सांगायचे, ‘‘तुम्ही आलात की, अत्तर-कापराचा सुगंध येतो.’’ कर्मचारी पहिल्या माळ्यावर असतात, तरीही त्यांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा सुगंध येतो. ते आम्हाला म्हणतात, ‘‘तुम्ही कोणते अत्तर वापरता ?’, ते आम्हाला द्या.’’ तेव्हा ‘गुरुदेवच सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय आवश्यक आहे ?’, ते देतात’, असे मला वाटते.

३ आ. कर्मचाऱ्यांकडील सनातनची सात्त्विक उत्पादने संपल्यावर त्यांनी ती घेण्यासाठी साधिकेच्या घरी येणे : बऱ्याच कारखान्यांमध्ये प्रत्येक मासाला सनातनची उत्पादने वापरणारे कर्मचारी लगेच विचारतात, ‘‘आमच्याकडील उत्पादने संपली आहेत. ती कुठे मिळतील ? आम्हाला तुमचा पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक द्या.’’ त्यांच्याकडील उत्पादने संपल्यावर ती घेण्यासाठी ते आवर्जून आमच्या घरी येतात. तेव्हा ‘गुरुदेव समाजातील लोकांपर्यंत सनातनची चैतन्यदायी उत्पादने पोचवण्याची व्यवस्था करतात’, असे मला जाणवते आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.

३ इ. कर्मचाऱ्यांनी अत्तर आणि कापूर यांचे उपाय शिकून घेऊन ते करणे आणि त्याविषयी इतरांनाही सांगणे : बऱ्याच कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना आम्ही कापूर आणि अत्तर यांच्या उपायांविषयी सांगितले. त्यांनी उपाय शिकून घेतले आणि स्वतः केले, तसेच त्याविषयी इतरांनाही सांगितले. यावरून ‘समाजातील लोकांची सनातनवर पुष्कळ श्रद्धा आहे आणि परात्पर गुरु डॉक्टर समाजातील लोकांकडूनही उपाय करवून घेत आहेत’, याची मला जाणीव झाली.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/586449.html

– सौ. आशा दिलीप कागवाड, बेळगाव (१२.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक