पुणे – पालखी सोहळ्याच्या कालावधीत पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भाविकांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल, तर ती मिळण्याविषयी आवाहन करून लसीकरणाची सुविधा द्यावी, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. (अशा सूचना का द्याव्या लागतात ? – संपादक) येथील विधान भवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालखी सोहळ्याच्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांना कार्यमुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय टँकरची व्यवस्था वाढवण्यात यावी. पालखी सोहळ्याच्या आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावेत. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्या दृष्टीने माहिती घेऊन अशी जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्याविषयी प्रस्ताव सिद्ध करावा अशा सूचनाही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न होण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.