परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

२२ मे २०२२ या दिवशी ८० व्या जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला. त्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. रथोत्सव चालू होण्यापूर्वी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्रीराम शाळिग्रामा’चे पूजन केले, तेव्हा ‘शाळिग्रामाच्या जागी साक्षात् भगवान शिव असून तो परात्पर गुरु डॉक्टरांना आशीर्वाद देत आहे’, असे मला दृश्य दिसले.

२. रथोत्सव चालू झाल्यावर

अ. माझ्या मनाला सतत आनंद जाणवत होता.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून वातावरणात दूरवर चैतन्याचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होत होती, तसेच रथोत्सवात भावपूर्ण सहभागी झालेल्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांकडून आशीर्वादात्मक चैतन्यलहरी प्राप्त होत होत्या.

इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाने रथोत्सवाभोवतीचा संपूर्ण परिसर चैतन्यमय बनल्याने रथयात्रेत वाईट शक्तींना कुठलाही अडथळा आणता आला नाही, तसेच वाईट शक्तींना चैतन्यामुळे रथोत्सवापासून दूर अंतरावर थांबावे लागले आणि त्याचा त्यांना राग आला आहे’, असे मला जाणवले.

३. रथोत्सवानंतर

रथोत्सव पूर्ण झाल्यावर महर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर फुले अर्पण केली. त्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची कोहळ्यावर जळता कापूर ठेवून दृष्ट काढली. त्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

३ अ. चरणांवर फुले अर्पण करणे : या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ सूक्ष्मातून ‘काही देवता हात जोडून उभ्या आहेत’, असे दृश्य मला दिसले. या प्रसंगातून यापूर्वी ‘गुरूंच्या चरणांजवळच सर्वकाही असते’, हे कीर्तन किंवा प्रवचन यांतून ऐकले होते. ते प्रत्यक्ष अनुभवता आले

३ आ. दृष्ट काढणे : या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांपासून काही अंतरावर त्यांना त्रास देण्यासाठी आलेल्या मोठ्या वाईट शक्ती मला दिसल्या. त्यांपैकी काही वाईट शक्तींची काळी शक्ती कोहळ्यात खेचली गेली. त्यामुळे ‘त्या वाईट शक्तींचा जोर काही प्रमाणात न्यून झाला आहे’, असे मला जाणवले.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक